आई-बाबा काहीच्या काही टार्गेट देवून टेन्शन का देतात?

-डॉ. योगिता आपटे

images : freepik

तुम्हाला शाळेत अभ्यास, मित्र, टारगट मुलं, शिक्षक अश्या अनेक गोष्टींचा ताण येऊ शकतो. पण शाळेच्या शिवाय इतरही अशी अनेक कारणं असू शकतात ज्याचा मुलांना स्ट्रेस येतो.

शाळेच्या वयाच्या मुलांना एकूणच घर आणि घरातली माणसं यामुळेही काही वेळा स्ट्रेस येऊ शकतो. त्यामागे अनेक कारणं असू शकतात. काही वेळा आईवडिलांचा स्वभाव रागीट असतो. काही वेळा त्यांना व्यसनं असतात. काही वेळा घरात आर्थिक अडचण असते. आईवडील त्यांच्या बाजूने खूप प्रयत्न करतात, तरीही त्यांना तुम्हाला पाहिजे ते सगळं देता येत नाही. यात त्यांच्यावरही ताण असतो. आणि मग तुमच्याही नकळत तो ताण तुम्हाला येतो.

 

 

 

हेही वाचा!

‘मुलांचे’ किंवा ‘मुलींचे’ खेळ असं काही असतं का?

घरातून ताण येण्यामागचं अजून एक कारण म्हणजे पालकांच्या अवाजवी अपेक्षा. म्हणजे नेमकं काय? अवाजवी अपेक्षा कशाला म्हणायचं? आणि योग्य अपेक्षा कशाला म्हणायचं? तर आपण थोडे जास्त प्रयत्न केल्याने जे आपल्याला जमू शकतं ती योग्य अपेक्षा. म्हणजे कसं? तर आपल्याला ६० टक्के मिळत असतील तर आईवडील म्हणतात की अजून थोडे प्रयत्न केलेस, जास्त अभ्यास केलास तर तुला ६५ किंवा ७० टक्के मिळतील. आणि ते मिळवण्यासाठी ते आपल्या मागे लागतात. आता ही झाली योग्य अपेक्षा. पण ६० टक्के मिळणाऱ्या मुलाने ९५ टक्के मिळवावेत ही झाली अवाजवी अपेक्षा. किंवा एखाद्या मुलाला जर मुळात विज्ञान आणि गणिताची आवड नसेल तर त्याला इंजिनिअर होण्यासाठी मागे लागणं ही झाली अवाजवी अपेक्षा. योग्य अपेक्षेमुळे आपली प्रगती होते, तर अवाजवी अपेक्षेमुळे आपल्याला स्ट्रेस येतो. मग अशा वेळी काय करायचं?

हेही वाचा!

मोठ्यांचं लहान्यांनी नेहमीच ऐकायचं, मग लहान्यांचं मोठे ऐकणार की नाही?

images : freepik

तर तुमचं म्हणणं आईवडिलांपर्यंत पोचवायचं. काही वेळा आपल्याला त्यांना थेट सांगता येतं, की हा विषय मला आवडत नाही, कितीही प्रयत्न केले तरी समजत नाही. पण काही वेळा मात्र आपल्याला असं वाटतं की आपण असं काही सांगितलं तर आईबाबा रागावतील. अश्या वेळी तुम्हाला समजून घेणाऱ्या घरातल्या दुसऱ्या एखाद्या मोठ्या माणसाशी बोला. आजी-आजोबा-आत्या-काका-मावशी-मामा-ताई-दादा-शेजारचे काका असं कोणीतरी असतं ना, ज्यांना आपण सगळं सांगू शकतो? त्यांना तुमची अडचण सांगा. काही वेळा आपले शाळेतले शिक्षक इतकेच्या इतके भारी असतात की आपण त्यांनासुद्धा हे सगळं सांगू शकतो. ते आपल्या आईवडिलांना आपलं म्हणणं सांगू शकतात.

yogeeta.apte@gmail.com

(लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशिका आहेत. )

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact