- विनय र.र

असावा नसावा सराटा फराटा या चार शब्दांमध्ये काही साम्य दिसतं का? अ आ आ! लक्षात आलं? प्रत्येक शब्दात पहिल्या अक्षराचा उच्चार आखूड आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षरांचा उच्चार लांबट आहे. या आखूड उच्चाराला लघु किंवा ऱ्हस्व उच्चार म्हणतात तर लांबट उच्चाराला गुरू किंवा दीर्घ उच्चार म्हणतात. असे आणखी खूप शब्द लिहायचे. करावा, भरावा, पसारा, ढगाचा, ही काही उदाहरणे झाली. ऱ्हस्व उच्चार जसा अकाराचा होतो तसा इकाराचाही उच्चार ऱ्हस्वच होतो, आणि उकाराचाही उच्चार ऱ्हस्व होतो. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे सर्व उच्चार दीर्घ होतात. आता काही तीन अक्षरी शब्द घ्या आणि त्यांपैकी कोणत्या शब्दांचे उच्चार - अ आ आ - असे होतात ते सांगा. तरीही, खुमारी, उभारी, अरेरे, गुलामी, कशाला, रुजावी हे शब्दही आपल्या अ आ आ नियमात बसतात. असे खूप शब्द सापडले की चार चार शब्दांची ओळ बनवायची अशा चार ओळी जमवल्या की आपली कविता तयार...
काही कवितांच्या एक दोन ओळी दिल्या आहेत, बाकीच्या ओळी बनवा. इतरांची मदत घेतली तरी चालेल.
* तुतारी धरावी मुखाशी करांनी भरावी हवाही मुखाने फुकोनी
* उन्हाचा तडाखा बसावा कशाला
हिवाळी दिवाळी जिवाला हवाला
* बघाव्या करोनी कवीता कवींनी
रहावा प्रवासी जरासा बसोनी
येथे कविता ऐवजी कवीता हा शब्द वापरला आहे - कवीला व्याकरणातून तेवढी मोकळीक घेता येते.
इंग्रजी शब्द अ आ आ या नियमात बसत असतील तर ते वापरून इंग्रजी कवितासुद्धा करता येईल उदा. बनाना
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


