मी काय करु?
- गौरी पटवर्धन

खरं म्हणजे सुट्टी संपल्यावर असा प्रश्न विचारणं हे जरा विनोदी आहे, पण तुम्ही कुठे निवासी शिबिराला किंवा गावाला गेला होता का? शिबिराची किंवा गावाला जाण्याची तारीख ठरते, मग त्याचं नियोजन होतं. किती दिवस जायचं, तिथे काय कार्यक्रम आहे, कपडे कुठले लागतील, आपल्याकडे कुठले कपडे आहेत, मुक्कामी राहण्याचं इतर सामान, त्यात अगदी टूथब्रश आणि कंगव्यापासूनच्या गोष्टी हे सगळं विचार करून भरायचं. हे सगळं करायला खरंच फार मजा येते. आपलं घर सोडून दुसरीकडे राहणं हा एक भारी अनुभव असतो. आपल्या वयाची भावंडं किंवा इतर मित्र मैत्रिणी भेटतात. रात्री उशिरापर्यंत जागता येतं, सकाळी उठल्या उठल्या दात घासून खेळायला सुरुवात करता येते.
अशी एकत्र राहण्याची मजा करण्याचा एक सोपा मार्ग असू शकतो. आपल्या शहरात राहणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींना रात्री आपल्या घरी राहायला बोलवायचं, किंवा आपण त्यांच्या घरी राहायला जायचं… थोडक्यात, रात्रनिवास करायचा! शनिवार आणि रविवार सुटी असताना मित्र मैत्रिणींसोबत रात्रनिवासाचं नियोजन करता येतं.
रात्रनिवास म्हणजे काय? तर मित्र मैत्रिणींनी एकमेकांच्या घरी एखादा दिवस राहायला जाणे. तुमच्यापैकी जे कोणी इंग्लिश कार्टून्स किंवा इतर कन्टेन्ट बघत असाल त्यांनी स्लीप ओव्हर हा शब्द नक्की ऐकलेला असेल. त्याचं मराठी रूप म्हणजे रात्रनिवास. तर, रात्रनिवासाच्या तयारीची सुरुवात होते, ती आधी आपल्या आईबाबांना पटवण्यापासून. सरळ आहे ना, आधीच तुम्ही सुट्टीभर घरात दंगा केलेला असणार. त्यात तुम्ही अजून एखादा मित्र किंवा मैत्रीण घरी राहायला बोलावली तर ते सहज हो थोडीच म्हणतील? शक्यच नाही. पण तरीही प्रयत्न करून बघा. विचारून बघा.
त्यांच्याही हे लक्षात येईल की तुमचा मित्र किंवा मैत्रीण घरी राहायला आली, तर तुम्ही त्यांना कमी त्रास द्याल. कारण तुम्हाला कमी कंटाळा येईल. एकदा आपल्या आईबाबांची परवानगी मिळाली की पुढचं आव्हान म्हणजे ज्या मित्राला किंवा मैत्रिणीला घरी बोलवायचं आहे तिच्या किंवा त्याच्या आईवडिलांची परवानगी मिळवणं. ती एकदा मिळाली, की तुम्ही पुढचं नियोजन करायला मोकळे.
मित्र / मैत्रीण किती वाजता येणार? कुठे झोपणार? ती आल्यावर तुम्ही काय खेळणार? घरात एखादा सिनेमा बघणार का? तुमच्याकडे खेळण्यासाठी पुरेसं साहित्य आहे का? कि मित्राने काही आणायचं आहे? मित्र आल्यावर आई बाबांना काहीतरी खायला करावं लागेल त्यासाठी त्यांना काही मदत हवी आहे का? असा सगळा विचार तुम्ही केलात, तर तुम्हाला रात्रनिवासाची परवानगी नक्की मिळू शकते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


