मी काय करु?
- गौरी पटवर्धन

आपण आवरलेल्या कप्प्यातल्या वस्तू चार दिवसात परत पसरतात, असं का होतं? कारण आपण त्या खरं तर आवरलेल्या नसतातच. मग खरं आवरणं म्हणजे काय? त्यात पुन्हा दोन प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे सामान खरोखर आवरणं. त्यातला सगळ्यात महत्वाचं काम असतं ते म्हणजे आपल्या सामानातली प्रत्येक वस्तू नीट बघायची, आणि जे काही खराब झालं असेल, मोडलं असेल, ज्या स्केचपेनमधली शाई वाळून गेली असेल, ज्या वॉटर कलरमधले रंग एकमेकात मिसळून सगळेच्या सगळे रंग नुसतेच कळकट्ट दिसायला लागले असतील, ज्या ब्रशचे केस झडून गेलेले असतील, ज्या वह्यांमधली सगळी पानं भरलेली असतील, ज्या पुस्तकातली सगळी चित्र रंगवून झालेली असतील.. ते सगळं सामान वेगळं काढायचं. एकदा आईवडिलांना दाखवायचं आणि सरळ टाकून द्यायचं.
त्यातला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जे सामान मोडलं आहे पण दुरुस्त होण्यासारखं आहे ते वेगळं काढायचं. त्यात रिफील बदलायची पेनं असतात, वेगवेगळ्या रंगपेट्यांमध्ये उरलेले खडू असतात, काही पानं कोरी असणाऱ्या वह्या / डायऱ्या असतात, अर्धे अर्धे उरलेले पत्त्यांचे कॅट असतात, वेगवेगळ्या खेळांमधल्या सोंगट्या आणि फासे असतात, फक्त सेल टाकल्याने सुरु होतील अशी खेळणी किंवा वस्तू असतात. तर असं सगळं सामान गोळा करायचं आणि त्यासाठी जे काही करायला लागणार असेल ते करून या सगळ्या वस्तू वापरत्या करायच्या. म्हणजे आपल्याला नक्की अंदाज येतो की आपल्याकडे नेमकं काय आणि किती सामान आहे. हे करून झाल्याच्या नंतरची पुढची पण एक पायरी असते, तिला म्हणतात मिनिमलिझम!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


