स्वयंपाकघरातली लुडबुड
- वैभव भाल्डे

झटपट पदार्थांची पाककृती शिकताना मजा येतेय की ? आज आपण शिकूयात असेच एक मजेदार पेय, लस्सी! सगळ्यांनाच लस्सी प्यायला आवडते. बाहेर गेल्यावर लस्सी पिण्याची इच्छा पूर्ण होते. तर कधी घरात मोठ्यांच्या मनात आलं तर लस्सी होते. पण इच्छा झाली आणि लस्सी प्यायला मिळाली असं होत नाही. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याला स्वत:ला ती करता येईल. त्यासाठी ती आधी शिकून घ्यायला हवी. आज लस्सीच शिकवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आधी समजून घ्या. साहित्य: घट्ट व ताजे दही १वाटी, साधारण ४-५ बर्फाचे खडे, दोन चमचे साखर, पाव चमचा मीठ, पाव चमचा व्हॅनिला इसेन्स.
लस्सीसाठी दही घरी विरजणार असाल तर म्हशीच दूध वापरा. ताज्या दह्याचे विरजण लावा व दही नीट लागल्याखेरीज वापरू नका. लस्सी बनवताना एका मोठ्या भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून खूप घुसळा, अगदी फेसाळ होईपर्यंत. किंवा सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून मोठ्यांच्या देखरेखीखाली फिरवा. पेल्यात ओतून गारेगार प्या व पाजा!! ह्यात बदल म्हणुन सांगू का काय करता येत? विविध इसेन्स वापरा, केशर वेलदोड्याचा स्वाद द्या, आंबा, स्ट्रॉबेरी सारख्या फळांचे तुकडे किंवा पल्प यात मिसळा. सर्व्ह करतांना वरून लोण्याचा, सायीचा किंवा मस्तपैकी आईस्क्रीमचा गोळा घाला. आवडीनुसार सुकमेवा मिसळा. मनासारखी लस्सी करताना कराल ते कमीच आहे बरं. काहीवेळा घरातील मोठ्यांना साखरेच पथ्य असतं, त्यांच्यासाठी नुसतं मीठ घालूनही गारेगार खारी लस्सी बनवू शकता . बाकी चव जशी आवडेल तशी साखर कमी जास्त करता येतेच! चवीला झकास, पोटाला गारेगार लस्सी तुम्हाला तर आवडेलच पण घरातल्या मोठ्यांनाही नक्कीच आवडेल, बनवणार नं मग?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


