पेरु खाऊ नका पिऊन बघा.पेरुचं आंबट -गोड- तिखट सरबत करा!

स्वयंपाकघरातली लुडबुड

- रागिणी थत्ते

Image: google

पेरु आवडतो ना खायला.पण पेरु नुसता चिरुन खाण्यापेक्षा त्याचे विविध पदार्थ तयार करु शकतो आपण. पेरुचे सरबत हा पेरुचा भन्नाट पदार्थ आहे. तुम्हा मुलांना एकच एक गोष्ट सतत दिली की कंटाळा येतो. तुम्ही नको नको म्हणतात. काही नवीन पदार्थ म्हटला की त्यावर तुटून पडतात. आपल्याकडे उपलब्ध जिन्नसातून नवीन काय करायचं हा देखील स्वयंपाकघरातला महत्त्वाचा प्रयोग आहे. म्हणूनच पेरूच्या सरबताचा प्रयोग तुम्ही करुन पाहायला हवा.

हेही वाचा!

मटकीला मोड आणा. पण उसळ नाही चटपटीत भेळ तयार करा!

पेरुच्या सरबतासाठी साहित्य काय लागेल?
एक मध्यम आकाराचा साधारण कच्चा पेरू,काळे मीठ, छोटा आल्याचा तुकडा, दीड चमचा लिंबूरस, तिखट आणि मीठ, चार खडीसाखरेचे खडे.
कृती -
आधी खडीसाखर दोन ग्लास पाण्यात विरघळत ठेवायची. पेरू धुवून त्याच्या फोडी करून घ्यायच्या. त्यात लिंबूरस आणि आले घालून मिक्सर मधून वाटून घ्यावं आणि गाळणीने गाळून घ्या त्यात खडीसाखरेचे पाणी घालून काळे मीठ चवीप्रमाणे घालून व्यवस्थित ढवळून घ्या.
एक ग्लास घेऊन त्याच्या कडेला लिंबूरस लावून घ्या आणि जे तिखटमीठ आहे ते ग्लास च्या कडेला गोलाकार लावून घेऊन त्यात हे सरबत घालायचे.
सरबत पिताना तिखट मिठाचा स्वाद छान लागतो.आणि पेरू अर्धा कच्चा असल्यामुळे त्याच्या सालाचा एक किंचित तुरटपणा असतो तो या सरबत मध्ये छान येतो. आता सरबत गार करून प्यायचे की असेच प्यायचे तो तुमचा चॉइस.
मुख्य गोष्ट म्हणजे सरबत तर तयार झाले पण ते करताना वापरलेली सर्व भांडी, चमचे, ग्लास यांचे काय केले? की ओट्यावर तसाच राडा ठेवला? चला पटकन सगळी वापरलेली भांडी/ वस्तू धुवून पुसून जागेवर ठेवा. ओटा स्वच्छ पुसून घ्या. स्वयंपाक घरात काम करताना स्वतःला एक शिस्त लावून घेतली की काम करणे सोपे जाते.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact