पोळ्यांची कणिक खेळायला घ्या आणि खाण्याच्या मजेदार वस्तू बनवा!

image : lil luna

तुम्हाला पोळ्यांची कणिक भिजवता येते का? येत असेल तर उत्तम, नसेल तर आईला विचारून घ्या. आपल्याला साधारण दोन ते तीन पोळ्यांची कणिक मळायची आहे.

पण ती नेहेमीच्या पोळीच्या कणकेसारखी नाही. तर त्यात दोन बदल करायचे. पहिलं म्हणजे त्यात तेल थोडं जास्त घालायचं. आणि दुसरं म्हणजे ती कणिक तुमच्या आवडीप्रमाणे गोड किंवा तिखट करायची.
कणिक जर गोड करायची असेल तर आधी गुळाचं पाणी करून घ्यायचं आणि त्यात ती कणिक भिजवायची. तुम्हाला जर तिखट आवडत असेल, कणकेत तिखट मीठ घालायचं. किंवा त्यात आलं लसूण पेस्ट, मिरपूड असे फ्लेवर्स पण चांगले लागतात.
यात तिखट वस्तूंना पालकाची पेस्ट, उकडलेल्या बीटाचा कीस असे पदार्थ घालून रंगसुद्धा आणता येतील.  कणिक पुऱ्यांसारखी घट्ट मळून घेऊन पंधरा मिनिटं ठेऊन द्यायची, आणि मग ती कणिक खेळायला घ्यायची.

 

 

हेही वाचा!

तुम्हाला मोहरी नाचवता येते का?

image : food network

 

आधी हात स्वच्छ धुवायचे आणि मग ती कणिक घेऊन त्यातून वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या. चिकणमातीच्या कशा आपण छोट्या छोट्या वस्तू बनवायचो, तशाच! त्या कणकेची कप, बशी, कढई, चमचा इथपासून ते तुम्हाला जमत असेल तर पार उंदीर, पाल, फळं असं काहीही बनवता येईल. तयार झालेल्या वस्तू ओलसर फडक्यात गुंडाळून ठेवायच्या. कारण त्या जर कोरड्या झाल्या तर त्यांना भेगा पडतील आणि तुमची सगळी वस्तू बिघडून जाईल.सगळ्या वस्तू तयार झाल्या, की एक रोवळी / चाळणी घ्यायची. तिला पुसट तेलाचा हात लावायचा. मग आपल्या वस्तू त्या रोवळीत / चाळणीत ठेवायच्या. ती चाळणी वरच्यावर बसेल अश्या भांड्यात अध्यार्ला कमी पाणी भरायचं. त्यावर ती चाळणी ठेवायची. त्यावर झाकण ठेवायचं आणि २० मिनिटं वाफ आणायची. आपल्या सगळ्या वस्तू खायला तय्यार! त्यातल्या गोड वस्तू तुपाशी आणि तिखट वस्तू चटणी किंवा टोमॅटो सॉस लावून मस्त खाऊन टाका. आता या वस्तू खायच्या आहेत हे लक्षात आल्यावर पुन्हा एकदा विचार करा, की आपण नेमकं काय बनवायचं? द्राक्षाचा घड का पालीचं पिल्लू???

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact