आपले मित्रमैत्रिणी अचानक वेड्यासारखे वागायला लागले तर करायचं काय?

-डॉ. योगिता आपटे

images freepik

असं कधीतरी होतं ना?

आपला एखादा मित्र स्वभावाने एरवी अगदी शांत असतो. फार बोलत नाही, दंगा करत नाही. आणि अचानक तो खूपच्या खूप बडबड करायला लागतो.

किंवा

आपली एखादी मैत्रीण एरवी खूप बोलणारी, गप्पा मारणारी असते. ती इतकी बडबड करते की तिच्यामुळे नेहेमी तिच्या शेजारी बसणाऱ्यालासुद्धा शिक्षा होते. पण मधेच ती एकदम गप्प गप्प रहायला लागते. आपण तिला विचारायला गेलो तर ‘काही नाही’ असं म्हणते. पण आपल्याला मात्र असं वाटत राहतं की तिचं काहीतरी बिनसलं आहे.

 

 

 

हेही वाचा!

टेन्शन आलं हे ओळखायचं कसं?

किंवा

आपल्याला अचानक सारखं रडूच यायला लागतं. म्हणजे कोणी फार रागावलं किंवा आपण पडलो म्हणून नाही. पण उगाच रडू यायला लागतं. कोणाशी बोलावंसं वाटत नाही.

किंवा

आपला एखादा मित्र सारखी भूक भूक करायला लागतो. स्वतःचा डबा तर खातोच. इतर मित्रांच्या डब्यातून पण खातो. आणि शिवाय शाळेच्या गेटबाहेर उभ्या असणाऱ्या पेरूवाल्याकडे बघत राहतो.

किंवा

एखाद्या मैत्रिणीचा डबा खरं म्हणजे फार छान असतो. इतका की सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना तिच्या डब्यातून एखादा घास तरी पाहिजे असतो. पण मध्येच ती डबा खाईनाशी होते. म्हणजे ती डबा शाळेत आणते. मधल्या सुट्टीत उघडते. थोडासा खाते. पण बाकी सगळा डबा मित्रमैत्रिणींना देऊन टाकते. आपण विचारलं तर म्हणते, “अगं मला भूकच नाहीये. काही खावंसं वाटत नाहीये.” मग आपण आनंदाने तिचा डबा खाऊन टाकतो. कारण आपल्याला तो आवडतच असतो. पण असं दोन - तीन - चार दिवस झालं की आपल्याला असं वाटतं, “रोज रोज भूक नाही असं कसं होईल?” पण ती असंच म्हणत राहते की “मला भूक नाहीये. खावंसं वाटत नाही.”

 

हेही वाचा!

सोशल मीडियामुळे सोशल स्किल्स कशी कमी होतील?

किंवा

एखादा एरवी शहाण्यासारखा वागणारा मित्र अचानक फालतू कारणांवरून भांडायला लागतो, चिडचिड करायला लागतो. म्हणजे खेळतांना चीटिंग तर सगळेच करतात. आणि समोरच्याने चीटिंग केली तर सगळेच चिडचिड करतात आणि भांडतात. पण ते भांडण काही टिकत नाही. थोड्या वेळाने सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येऊन पुन्हा खेळायला सुरुवात करतात. पण तो एखादा मित्र मात्र इतकी चिडचिड करतो की थोड्या दिवसांनी आपल्याला असं वाटायला लागतं की त्याला खेळायला घ्यायलाच नको.

 

किंवा एखादी मैत्रीण सारखी सारखी आजारी पडायला लागते. एकदा पोट दुखतं तर एकदा डोकं दुखतं. एकदा अंग दुखतं तर एकदा नुसतंच बरं वाटत नाही म्हणते. तिला तिचे आईवडील डॉक्टरकडे घेऊन जातात. पण त्यात काहीच सापडत नाही. मग हळूहळू सगळ्यांना वाटायला लागतं की ती नाटकं करते आहे. अभ्यास करायला नको म्हणून किंवा शाळेला दांडी मारण्यासाठी खोटं बोलते आहे.

किंवा…

एखादा मित्र किंवा मैत्रीण अचानक नखं कुरतडायला लागतो. किंवा त्याहून कमाल म्हणजे चक्क अंगठा चोखायला लागतो. सगळे जण त्यावरून त्याला रागावतात, पण त्याला काही केल्या ती सवय सोडताच येत नाही.

हे सगळं कशामुळे होतं माहितीये? तर सतत अतिरिक्त ताण आल्यामुळे… टेन्शनमुळे!

आणि अश्या वेळी आपण मित्रमैत्रिणी म्हणून काय करायचं? तर असं वागणाऱ्या मित्रमैत्रिणींना सोडून द्यायचं नाही, त्यांना चिडवायचं नाही. तर आपल्या शिक्षकांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या आईबाबांना सांगायचं! म्हणजे ते तुमच्या मित्राला / मैत्रिणीला मदत करतील. 

 

yogeeta.apte@gmail.com

(लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशिका आहेत. )

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact