
सुट्टी लागण्यापूर्वी आपण सुटीची किती वाट बघत असतो. पण सुट्टी लागली की थोड्याच दिवसात आपल्याला बोअर व्हायला लागतं. मग रोज सकाळी उठलं की आपला पहिला प्रश्न असतो, “आज मी काय करू?”
आणि त्यावर आईवडिलांचं उत्तर,
“सकाळी सकाळी कटकट करू नकोस.”
“तुमची शाळा सुरु होती तेच बरं होतं.”
“तुझं तू बघ. सगळं कशाला आईने सांगायला पाहिजे?”
हेही वाचा!
घर खर्चाचा हिशेब आपणही करुन बघूयात. बघा जमतो का?
या सगळ्यापासून सुटका पाहिजे असेल तर तुमच्या जुन्या झालेल्या कपड्यांचं गाठोडं उघडा. त्यात एखादी तरी जुनी जीन्स असेलच. तुमच्या जुन्या कपड्यांमध्ये नसेल तर ताईच्या / दादाच्या / काकाच्या / मावशीच्या / आत्याच्या कोणाच्या तरी कपड्यांमध्ये एखादी जुनी जीन्स नक्की सापडेल. ती स्वच्छ धुवा. वाळवा. तिला इस्त्री करा. आता आपला कच्चा माल तयार आहे. या जीन्सपासून आपल्याला काय काय करता येईल ते बघा.

१. जीन्स आपल्या मापाची असेल, तर तिची शॉर्ट्स करता येईल. आपल्या पाहिजे तेवढं माप घेऊन जीन्स कापायची. आणि मग आईने कितीही सांगितलं तरी त्याला खालून टीप घालायची नाही. खालचे काही दोरे काढायचे आणि मग खालच्या दशा चक्क विंचरायच्या. जीन्सची शॉर्ट्स तयार!
२. जीन्सचे दोन्ही पाय जिथे वेगळे होतात तिथे जीन्स कापायची. खालून शिवण मारायची. वरून एक चेन किंवा वेल्क्रो किंवा बटणं लावायची. खालच्या पायांच्या पट्ट्या बनवून त्याचा बेल्ट करायचा. जीन्सची बॅग तयार! जीन्सचे सगळे खिसे त्या बॅगचे कप्पे म्हणून वापरता येतात.
३. मुलींसाठी… जुन्या जीन्सचे पाय उसवायचे. ते समोरच्या आणि मागच्या बाजूला शिवायचे. आणि मग आपल्याला पाहिजे तेवढ्या उंचीवर स्कर्ट कापायचा. त्याला मात्र खालून शिवण घालायची.
४. अगदी फाटलेली जीन्स असेल तर तिच्या फक्त दोन हिप पॉकेट्सचं वॉल हँगिंग बनवायचं.
सगळ्यात महत्वाचं... आई आणि बाबाची जीन्स घेण्यापूर्वी सावधान! चुकीची जीन्स फाडलीत तर सुट्टीतले सगळे उद्योग बंद होण्याचा धोका आहे!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


