लॅटरल लेग लिफ्टस व्यायाम करुन अंगातल्या आळसाला बाहेर काढा!

Image: .yogaclassplan

एकदा शाळा सुरु झाली की मैदानावरच्या खेळांना ब्रेक लागतो. कारण शाळा, क्लास असेल तर क्लास, दोन्हींचा अभ्यास असं बरंच काही आपलं दिवसभर सुरु असतं. मग मित्रांसोबत जावून मैदानावर खेळ खेळायला वेळ मिळतंच नाही, मिळाला तरी कमी मिळतो. अनेकजण ग्राउण्डवर जावून खेळण्यासाठी शनिवार रविवारचा दिवस निवडतात. पण अनेकजण मात्र बशे आणि झोपेच असतात. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? पण हे नवीन नाही. तुमच्यासारख्या अनेकांचा तो गुणधर्म आहे. म्हणजे मिळाला वेळ की लोळत पडणारे, लोळत टीव्ही पाहाणारे असे ते झोपे आणि बशे म्हणजे ठम्यासारखे एका जागी बसून राहाणारे. इतरांना पाहून कंटाळा येतो, पण या एका जागी बसून राहाणाऱ्यांना मात्र कंटाळा येत नाही. बसल्या बसल्या टीव्ही पाहाणे, मोबाइलवरचे गेम खेळणे असा त्यांचा टाइमपास सुरु असतो. हे म्हणजे बशे. तर सतत लोळल्याने, एकाच जागी बसल्याने अंगात आळस भरतो. अंगात आळस भरला तर साधं समोरचं जेवायचं ताटही जेवण झाल्यानंतर उचलून ठेवण्याची इच्छा होत नाही. तुम्ही तर सर्व विद्यार्थी. तुम्हाला अभ्यास, प्रोजेक्ट असं किती आणि काय काय करावं लागतं. यासाठी अंगात उत्साह तर हवा ना. आणि उत्साह मिळवण्यासाठी आधी अंगात शिरलेला आळस बाहेर काढायला हवा. त्यासाटी एकदम फायदेशीर व्यायाम आहे. हा व्यायाम म्हणजे 'लॅटरल लेग लिफ्टस

हेही वाचा!

या व्यायामानं आपल्या अवयवांना काम मिळतं. त्यांना काम मिळालं की ते कुरकुरत नाही. तुम्हाला हे तर माहीतच असेल ना की, आपले हात-पाय हलवण्याला खूप महत्व आहे. ते जर हलवलेच नाहीतर ते काम करणं बंद करतील. म्हणजे बघा, एखादा दरवाजा, खिडकी आपण बरेच दिवस उघडले नाही, तर त्यात धूळ साचते, काही वेळा त्यातल्या बिजागऱ्या गंजतातही आणि उघडताना ते नीट उघडत नाहीत. जोर लावावा लागतो किंवा करऽऽ करऽऽ असा आवाज येतो. आपल्या शरीराचे अवयवही आपण रोज वापरले नाहीत, तर त्यांनाही गंज चढतो. असा गंज आपल्या अवयांवर, स्नायुंवर चढू नये म्हणुन हा लॅटरल लेग लिफ्टस हा व्यायाम करायचा असतो.

तुम्ही ‘बशे’ आणि ‘झोपे’ कोणी का असेना, हा व्यायाम करताना प्रत्येकाला मजा येईल याची मात्र खात्री आहे. कारण हा व्यायामही झोपल्या झोपल्या करायचा आहे. पण झोपेत आणि झोपेतून उठल्या उठल्या बेडवरच करायचा नाही.

लॅटरल लेग लिफ्टस कसे करणार?

१. जमिनीवर मॅट टाकून झोपा एका साइडला. म्हणजे एका कुशीवर.

२. दोन्ही पाय एकावर एक ठेवा.

३. एक हात डोक्याखाली घ्या.

४. आपली संपूर्ण बॉडी एका रेषेत, सरळ हवी.

५. आता वरच्या बाजूला आपला जो पाय असेल, तो अंदाजे अठरा इंच किंवा तीस ते चाळीस अंश वर उचला.

६. पाच सेकंद तो तसाच ठेवा.

७. असं दहा वेळेस करा.

८. आता हीच कृती विरुद्ध बाजूनं पुन्हा दहा वेळेस करा.

 Image: health.harvard

लॅटरल लेग लिफ्ट्सचा फायदा काय?

१. ‘बशे’ मंडळींना याचा फार फायदा होईल. जे बराच वेळ खुर्चीवर किंवा खाली बसलेले असतात. त्यांचे सांधे यामुळे मोकळे होतील.

२. तुमचे ग्लुट्स मसल्स स्ट्रॉँग होतील. आपण ज्या ज्या वेळी पाय हलवतो, उचलतो, चालतो, पळतो, त्यावेळी या मसल्सचा उपयोग होतो. ते स्ट्रॉँग झाले की, तुमच्यातला आळसही कमी होईल.

३. आपले गुडघे, ढुंगण आणि लोअर बॅकचे मसल्स बळकट होण्यासाठीही याचा चांगला उपयोग होईल.

- ऊर्जा

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact