पाठ बळकट करण्यासाठी मांजरीसारखं बसा. मांजरीचा व्यायाम करा!

Image: vectorstock

तुम्हाला माहीत आहे, व्यायाम करण्यात माणूस सगळ्यात आळशी प्राणी आहे. निसर्गात सगळे पशू, पक्षी रोज व्यायाम करतात. निसर्गाकडून आणि आपल्याच आई-बाबांकडे बघून लहानपणापासून ते अनेक गोष्टी शिकत असतात.

अनेक व्यायामप्रकार माणसानंही या प्राण्यांकडे बघूनच शिकले आहेत. मार्शल आर्ट्मध्ये तर अनेक प्रकार प्राण्यांचं निरीक्षण करून त्यानुसार माणसानं ते शिकून घेतले आहेत.

कुंगफू, कराटेवाले, हाणामारीचे सिनेमे तुम्ही कधी पाहिले आहेत? नसतील तर काही सिनेमे नक्की बघा. कधी कधी आपल्या हिंदी सिनेमांतल्या मारामारीतही त्या अ‍ॅक्शन दाखवतात. साप, मुंगुस, माकड, वाघ लढाईत जसा पवित्रा घेतात, त्याप्रमाणे मारामारीत त्या अ‍ॅक्शन आपल्याला पाहायला मिळतील.

आज मी तुम्हाला सांगणार आहे, तो मांजरीचा व्यायाम.तुम्ही पाहिलंय, मांजर बऱ्याचदा आपले दोन्ही पाय पुढे ताणते, पाय जवळ घेऊन आपल्या पाठीचा पोक करून पाठ आकाशाकडे ताणते. तोच व्यायाम आज आपल्याला करायचा आहे. या व्यायामाचं नाव आहे ‘कॅट स्ट्रेचिंग’!

हेही वाचा!

कसं करायचं कॅट स्ट्रेचिंग?

१. खाली सतरंजी टाकून तळपाय आणि गुडघ्यावर ओणवे व्हा.

२. दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये आपल्या खांद्याइतकं अंतर घ्या.

३. आपली पाठ आता आकाशाच्या दिशेनं सोसेल इतपत ताणा.

४. पाच सेकंद त्याच स्थितीत राहून नंतर पुन्हा मूळ स्थितीत या.

५. आता विरुद्ध दिशेने म्हणजे आपली पाठ जमिनीच्या दिशेनं खाली ताणा.

६. असं पाच-पाच वेळा करा.


मांजरीच्या व्यायामानं काय होईल?

१. आपली पाठ बळकट करण्यासाठी हा अतिशय उत्तम व्यायाम आहे.

२. विशेषत: लोअर बॅकसाठी याचा फारच फायदा होतो.

३. यामुळे बॉडी छान रिलॅक्स होते.

४. दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि आळस आलेला आहे, अंग आंबलेलं आह, अशावेळी हा व्यायाम जरूर करून पाहा. एकदम मस्त वाटेल.

आता यापुढे निसर्गात प्राणी, पशू, पक्षी यांचं आवर्जून निरीक्षण करा. खूप नव्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. पण त्याआधी आज मांजर तर होऊन बघा..

-ऊर्जा

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact