वर्गात शिकताना माझं लक्षच लागत नाही.मन एकाग्र करण्यासाठी मी काय करु?

Image: freepik

माझे वर्गात मन एकाग्र होत नाही तर मी काय करु?

- तेजस हासे, इयत्ता 5 वी, मा.रु.दा.मालपाणी विद्यालय, संगमनेर

- शाळेत शिकवलेलं नीट समजलेलं असलं तरच घरी जाऊन त्याचा अभ्यास करता येणं शक्य होणार असतं. यासाठी शिक्षक शिकवताना त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि वर्गात बसल्यावर लक्ष लागत नसेल तर त्यावर आपणच उपाय करणं गरजेचं असतं. त्यासाठी कोणत्या कारणामुळे तुझं वर्गात लक्ष लागत नाही हे बघ. वर्गात मागच्या बाकावर बसलं की शिक्षकांचं आपल्याकडे लक्ष नाही असं वाटून तुझा टाइमपास होत असेल तर आधी तू बसण्याची जागा बदलायला हवी. पुढच्या बाकावर किंवा शिक्षकांना तू सहज दिसू शकशील अशा अंतरावर येवून बस. शिक्षक केव्हा काहीही विचारू शकतील या तयारीने तू जर वर्गात बसला तर तुझं वर्गातलं लक्ष नक्की सुधारेल.

- शिक्षक जेव्हा शिकवत असतात तेव्हा नुसतं बसून ऐकण्यापेक्षा तू वहीत रनिंग नोटस काढण्याची सवय लावून घे. ऐकून लिहिताना कान, मेंदू ,हात एकाच वेळेस काम करतात. नुसतं बसून ऐकण्यापेक्षा जे समजलं नाही त्यावर शिक्षकांना प्रश्न विचार, शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावर तू उत्तरं दे, वर्गातल्या चर्चेत सहभागी हो. अशा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनमुळे तुझी लक्ष देवून ऐकण्याचीत क्रिया चांगली होईल.

- रात्री उशिरा झोपणं, झोपताना मोबाइल पाहाणं यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि मग वर्गात मन लागत नाही. हे टाळण्यासाठी रोज लवकर आणि वेळेवर झोप.

- रोज सकाळी शाळेला निघण्यापूर्वी थोडा व्यायाम कर. यामुळे तुझ्या शरीर आणि मनाला ऊर्जा मिळेल. मरगळ दूर होईल.

- शिक्षकांनी शिकवलेलं कळत नसल्यास दुसऱ्या दिवशी शिक्षक काय शिकवणार ते घरी आधी वाचून ठेव. यामुळे वर्गात शिक्षक काय शिकवताय त्याची लिंक तुला लागेल आणि लक्ष देऊन ऐकण्याची क्रिया सुधारेल.

- वर्गात लक्ष लागत नसल्यास दीर्घ श्वसनासारखे श्वासाचे व्यायाम कर.श्वासावर लक्ष केंद्रित कर आणि तरीही लक्ष न लागण्याची समस्या कायम असल्यास आई बाबांशी, शिक्षकांशी बोल.

- रोज चौसस आहार घेणं, पुरेसे पाणी पिणं या गोष्टीही तुझं वर्गातलं लक्ष सुधारण्यास मदत करतील.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact