मला घरातले काडीपैलवान म्हणतात! मी एवढा बारीक का आहे?

- डॉ. वैशाली देशमुख

'अर्जुन, दादाला टेबलवर ठेवलेलं दूध दे जरा.' आईनं अर्जुनला हाक मारली. 'च्च, त्याला नाही का घेता येत? माहितेय मोठा बॉडी बिल्डर आहे ते! किती भाव खातो जिममधे जातो म्हणून!' कुरकुरत त्यानं दादाला दूध दिलं. दादा फुटबॉल खेळायचा. एक दिवससुद्धा व्यायाम चुकवायचा नाही. अर्जुनला त्याच्या बॉडीचा खूप हेवा वाटायचा. अधूनमधून तो आरशात आपल्या दंडाची बेटकुळी दिसते का ते पाहायचा. आणि आपले काडीसारखे दंड बघून सुस्कारा सोडायचा. एकदा दादानं त्याला आरशात बघताना पकडलं.

Image: freepik

 

 

अर्जुनला वाटलं तो आपल्याला खूप चिडवणार नेहमीसारखा. तो पटकन पळून जाणार होता, तेव्हढ्यात दादा म्हणाला, 'काय काडीपैलवान, काय चाललंय? दिसतायत का काही मसल्स?' 'नाही ना.. खरंतर मलापण तुझ्यासारखं जिम लावायचंय. पण बाबा नाहीच म्हणतात. म्हणे अजून लहान आहेस. तू तुझ्या बास्केटबॉल खेळण्यावर लक्ष दे. आता बास्केटबॉल खेळून काय बॉडी बिल्डिंग होतं का ?'

 

 

 

 

हेही वाचा!

इतके पिंपंल्स आहेत, चेहेरा दाखवायची लाज वाटते !

दादा हसायला लागला. 'अर्जुन, तुला स्ट्रॉंग व्हायचंय ना? मग तुझे फक्त मसल्स दिसायला लागून उपयोग नाही, ते मजबूतही व्हायला हवेत. तुझी हाडं चांगली घट्ट व्हायला हवीत. त्या सगळ्यासाठी लागणारी प्रोटीन्स तू खातोयस का?'

'हो. मी दूध पितो, कडधान्यं खातो, सुकामेवा खातो. कधीतरी ऑम्लेट सुद्धा खातो. प्रोटीन्सचे डब्बेसुद्धा मिळतात ना. ती पावडर खाल्ली तर वाढेल ना बाॅडी!'

'मी त्या महागड्या पावडरी खाल्लेलं पहिलं आहेस तू कधी? असं झटपट काही मिळालं ना की आपलं शरीर गोंधळून जातं. शिवाय त्या प्रथिनांचा मसल्समधे वापर होण्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे व्यायाम. त्यासाठी तुला जिममधे जायची गरज नाही. कारण आत्ता त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होऊ शकतो. रोज तासभर, भरपूर घाम येईपर्यंत तू जे खेळतोस त्यामुळे तुझं शरीर आतून मजबूत होतंय. दुसरं म्हणजे टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन. ते मुलांच्या शरीरात दहा-बारा वर्षांच्यानंतर हळूहळू वाढायला लागतं.”

हेही वाचा!

माझी उंची अजून का नाही वाढली?

Image: freepik

“म्हणजे? आत्ता नाही वाढणार मसल्स?” अर्जुनचा चेहरा जरा हिरमुसला.

“तू आता दहा वर्षांचा आहे. म्हणजे आत्ता कुठे टेस्टोस्टेरॉन वाढायला सुरुवात झालीय. आत्ता तू चांगलं अन्न आणि भरपूर खेळ, म्हणजे टेस्टोस्टेरॉन वाढायला खतपाणी मिळेल.  जेव्हा हे टेस्टोस्टेरॉन  वाढेल तेव्हा तुझं शरीर तयार असेल. नंतर तू कुणाच्या तरी देखरेखीखाली लागतील ते व्यायाम करू शकशील. मग दिसायला लागेल तुझ्याही दंडात बेटकुळी. काय म्हणतोस मग?' दादानं हात पुढे केला आणि अर्जुननं त्याला हसत टाळी दिली.

(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)

vrdesh06@gmail.com

 

 

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा...  तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा  : ९११२०५०५५००
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact