
मला कळतंच नाही की मी माझं ध्येय कोणत्या वयात ठरवायला हवं. समजा ते मी लवकर ठरवलंच नाही तर काय होईल? -
स्वामिनी सप्रे
- ध्येय, गोल हे लहान मुलांसाठी फार मोठे शब्द झाले. पण म्हणून ते मोठ्यांसाठीच आहे आणि मोठ्यांनीच ते ठरवावे असं नाही. खरंतर लहान मुलं असू देत किंवा मोठी माणसं ती जे काही काम करतात त्या प्रत्येका मागे काहीना काही ध्येय असतं. एखादं काम करुन प्रत्येकाला काही ना काही मिळवायचं असतं. साधं आपण मित्र मैत्रिणींशी खेळतो तेव्हा मला जिंकायचय,चांगलं करुन दाखवायचं असं ठरवनूच खेळत असतो. परीक्षा देतो तेव्हा चांगले मार्क्स मिळवण्याचं ध्येय असतं. म्हणजे आपण कोणतीही कृती करतो तेव्हा आपलं ध्येय ठरलेलं असतं. फक्त आपण जे ठरवतो त्याला ध्येय किंवा गोल म्हणतात एवढं कदाचित माहिती नसतं. छोट्या छोट्या ध्येयांसोबतच मोठी ध्येयं ठरवणं, ती ठरवलेली असणं ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे.
- ध्येय हे अमूकच वयात ठरवायला हवं असा काही नियम नाही. पण आपलं काहीतरी ध्येय म्हणजे 'गोल' ठरलेला असणं आवश्यक असतं. ध्येय समोर असलं की आपल्याला काय करायला हवं ते समजतं.
- शालेय वयात चांगला अभ्यास करणे, परीक्षेत उत्तम गुण मिळवणे, खेळ, आपल्या आवडत्या कलेत, छंदात चांगली कामगिरी करणं, त्यात टप्प्याटप्प्याने पुढे जात राहाणं असं ध्येय तू निश्चित करु शकते.
- ध्येय ठरवताना ती छोटी छोटी असायला हवीत. ती तुझ्या आवाक्यातली म्हणजे पूर्ण करता येणं शक्य असणारी हवीत. एकदम मोठी ध्येय ठरवायला छान वाटतं. पण ती पूर्ण करता येणं हे अवघड आहे असं वाटायला लागलं की आपण प्रयत्न करणं सोडून देतो. निराश होतो.
- आयुष्यभरासाठी एकच एक ध्येय ठरवायचं असं नाही. प्रत्येक टप्प्यावर ध्येय बदलत जातं. तुझं वय, तुझी आवड निवड, वातावरण, उपलब्ध संधी,तुला मिळणारे अनुभव याच्या आधारावर तुझी ध्येयं सतत बदलत राहातील. . पण तू जेव्हा जेव्हा जे ध्येय ठरवशील ते मध्येच सोडून देऊ नको. ते पूर्ण करण्यासाठी जरुर प्रयत्न कर.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


