शिकवण्याआधीच धडा वाचण्याचा होतो फायदा.. तो कसा?

मेंदूचे सिक्रेटस

- डाॅ. श्रुती पानसे

Image: freepik

नव्या वर्षातली पुस्तकं हातात आली की एक गंमत करूया. सावकाशपणे एक एक पुस्तक उघडून बघा. मी लहानपणी सर्वात आधी मराठीचं पुस्तक उघडायचे. सुट्टीतच पुस्तक हातात येत असल्यामुळे शाळा सुरू होण्याआधी धडे वाचून व्हायचे. तुझा जो कुठला आवडता विषय असेल, त्या विषयाचं पुस्तक हातात घे. एक एक पान उलट. सुरुवातीच्या पानांमध्ये शिक्षकांसाठी सूचना असतात. हे पुस्तक कसं शिकवायचं याच्या, तेही वाचायला हरकत नाही. हे पुस्तक कोणी तयार केलं, याची यादी असते. ती पण वाचायला हरकत नाही.

एकेक पान बघत गेलं की आपल्याला या पूर्ण वर्षामध्ये हे पुस्तक वाचून संपवायचं आहे. फक्त वाचायचं नाही तर त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. या पुस्तकातल्या धड्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे. हे पुस्तक आपल्याला पुढच्या वर्षी वरच्या वर्गात जायला मदत करणार आहे. आपल्याला असलेल्या माहितीमध्ये भर घालणारं हे पुस्तक असणार आहे.

 

हेही वाचा!

आपल्या मेंदूला काय आवडतं हे तुम्हाला माहिती आहे का?

अशा विचाराने जर आपल्या आवडीच्या विषयाचे पुस्तक हातात धरलं, तर त्या पुस्तकाची एक छान नातं तयार होईल. पूर्ण वर्ष या सर्व पुस्तकांची साथ आपल्याला असणार आहे. ही पुस्तकंच आपल्याला मोठे व्हायला मदत करणार आहेत.
शिकणं म्हणजे आधी असलेल्या ज्ञानावर नव्या ज्ञानाची रचना करणं, असं ज्ञानरचनावाद सांगतो. आपण पुस्तक थोडंस का होईना आधीच वाचलं तर त्याबद्दल कुतूहल निर्माण होतं. वर्गात गेल्यावर शिक्षक जे शिकवतील, ते आधी माहीत असेल. समजून घेणं, आकलन करून घेणं सोपं जाईल.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact