स्वयंपाकघर म्हणजे रासायनिक गोष्टी आणि क्रियांची प्रयोगशाळा. ती कशी?

- सागर दामले

Image: freepik

"अगं, फॅन्सी मीठ काही घेऊ नकोस साधं सोपं आयोडिन युक्त मीठ घे. "
"हा तांब्याचा कलश किती काळवंडला आहे? चिंचेचा कोळ आणि नारळाच्या शेंडीने चकचकीत कर. "
"अरे देवा, हे काय.. रगडा पॅटीस करणार होते. वाटाणे कुकरला लावले तर झाकण उघडून बघितलं तर सगळं लालेलाल.. "
आपण सगळे रसायनांनी वेढले गेलेलो आहोत, मग स्वयंपाकघर कसं मागं राहील? मुळात अन्न शिजण्यासाठी रासायनिक क्रिया घडाव्या लागतात. या सुट्टीत आपण अशाच गमतीशीर आणि निर्धोक रासायनिक क्रिया घरच्या घरी करू शकतो आणि आपल्या ज्ञानात प्रयोगांती भर घालू शकतो.
वरचीच उदाहरणे पाहू..

१ . मिठात लिंबू पिळा, ओल्या मिठाचा रंग निळा झाला तर त्या मिठात आयोडिन आहे.  १९९६-९७ साली भारत सरकारने सर्व मीठ उत्पादक कंपन्यांना मिठात आयोडिन घालायला लावलं. यामुळे *गलगंड* या आयोडिन कमतरतेमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव जवळ जवळ संपुष्टात आला.

२ . चिंचेमध्ये टार्टरिक नावाच आम्ल असतं. हे आम्ल, कलशाच्या पृष्ठभागावर जमलेले कॉपर ऑक्सइड काढून टाकते. तुम्ही तुमचा आवडता केचप घेऊन सुद्धा कलश चकचकीत करू शकता. कसं काय बुवा?... तुम्हीच सांगा.. केचप मधे काय काय असतं त्याची यादी पहा.
३. हा प्रयोग तर जादूचा प्रयोग आहे. जर वाटाणे किंवा छोले मऊ शिजावेत म्हणून खायचा सोडा घातला असेल आणि चुकून त्यात हळद घातली गेली तर असं घडू शकतं. याचं कारण आहे हळदीमध्ये असणारा *करक्युमिन* नावाचा घटक ! आम्लयुक्त द्रावण असेल तर हळद पिवळीच राहते. पण आम्लरी द्रावणात हळदीचा रंग लाल किंवा गुलाबी होतो. आता तुम्ही, घरातील आम्ल आणि आम्लारी द्रावणे शोधून काढा बरं.. एक आम्लारी आंघोळ करताना सापडू शकतो आणि एक आपल्या त्रयोदशगुणी विड्यात सुद्धा असतो बरं.. शोधा.. शोधा..

( लेखक मुंबई स्वयंपाकघर या फेसबुक ग्रूपचे सदस्य आहेत.)