-अनन्या भारद्वाज

‘बघा तुमचं तुम्ही, खिचडी नी वरण भात तुम्हीच खा ..? माझे हक्का नूडल्स आणि ट्रिपल शेजवान राइस येतीलच आता..!’
अर्णवने हातातला मोबाइल आईच्या दिशेनं फेकला आणि टीव्हीचा रिमोट हातात घेऊन बसला!
आईने शांतपणे पाहिलं तर तिच्या जीपेतून ५५० रुपये उडाले होते. स्वयंपाकघरात वरणभाताचा कूकर शिट्ट्या मारतच होता. आजीने कालपरवाच पाठवलेले रव्याचे लाडू बरणीत तसेच पडून होते. अर्णवच्या आईचा खरंतर संताप झाला होता, पण रोजच्याप्रमाणे ती गप्प बसली.
आता अर्णवचं हे रोजचंच झालेलं होतं. अर्णव आठवीत आहेे, तो शाळेतून येतोच ३ वाजता, येताच दप्तर फेकतो-आईचा मोबाइल हातात घेतो आणि फूड डिलिव्हरी ॲप उघडून आवडेल ते ऑर्डर करुन मोकळा होतो. आईने मोबाइल लपवलाच तर त्यादिवशी तो जेवतच नाही, चिडतो-भडकतो.
हेही वाचा!
तुमचे आई बाबा'डोक्याला शाॅट' देतात असं का वाटतं तुम्हाला?
एक दिवस अर्णवच्या आईने त्याच्या मित्रांच्या आयांच्या ग्रुपवर हा विषय काढला तर सगळ्याच आया म्हणत होत्या की मुलं सतत त्यांच्या मोबाइलवरुन खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करतात. डिजिटल पेमेंट करुन मोकळे होतात.
घरी आईनं केलेलं अन्न मुलांना ‘टेस्टलेस’ वाटतं आणि बाहेरचं चमचमीत!
आईने अगदी हॉटेलसारखाच पदार्थ करते म्हंटलं किंवा केला तरी मुलं खाताना नाकं मुरडतात.
-अर्णव आणि त्याच्या मित्रांची ही गोष्ट तुम्हाला थोडी ओळखीची वाटते का? शहरी मुलांना तर वाटेलच, ग्रामीण भागातली मुलं ऑर्डर नाही करत पण कुरकुरे, मॅगी नी रेडीटूकूक पाकिट आणून खातातच घरात.
गंमत अशी झाली आहे की आईबाबांची पिढी जेव्हा तरुण होती तेव्हा जेवायला ‘बाहेर’ जावं लागायचं, वडापाव-समोसा-भेळ निदान घरापासून लांब जाऊन खावी लागायची. घरात भाजीभाकरी वरणभातच मिळायचा.
पण आता स्मार्टफोनच्या काळात घरबसल्या कुणीही हॉटेलातलं जेवण ऑर्डर करु लागलं.
आणि मग बिझनेसमन लोकांच्या लक्षात आलं की या घरोघरच्या मुलांकडे पैसे नाहीत पण त्यांचा हट्ट कुणी मोडत नाहीत.
ते बिंधास्त आईबाबांचे पैसे खर्च करतात आणि हवं ते घरीच मागवून खातात!
गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेला अमेरिकन मुलांचा अभ्यास सांगतो की त्यांच्या देशात ९३ टक्के मुलं, वय १० ते १५ पॅकेज्ड फूडच खातात आणि त्यातलेही निम्मे रोज बाहेरचंच खातात!
अमेरिकन मुलांची गोष्ट कशाला सांगायची इथे असा प्रश्न पडला असेल तर ही गोष्ट अमेरिकेची नाही जगभरात स्मार्टफोन हातात असलेली मुलं ‘ऑनलाइन‘ पदार्थ ऑर्डर करत आहेत.

... मग बिघडलं कुठं?
अर्णवनेही त्याच्या आईला एकच प्रश्न विचारला, मग काय बिघडलं?
पाहा कुठंकुठं बिघडतं!
१. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेरचं अन्न महाग असतं. म्हणजे पाहा, १ किलो तांदूळ विकत आणला तर साधारण ८० रुपये लागतात. बिर्यानी किंवा पुलाव मागवला तर अडिचशे ते तीनशे रुपये लागतात. आणि ती एक प्लेट एकाच माणसाला पुरते. म्हणजे खर्च वाढतो. एका अभ्यासानुसार तर केवळ जंक फूडच्या जाहिराती पाहिल्यानेही मुलं दररोज सुमारे १३० कॅलरी जास्त खातात.
२. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या टेस्ट बड्स बिघडतात. सौम्य चवीचे, घरचे, पारंपरिक पदार्थ त्यांना आवडतच नाहीत. आवडते ते केवळ झणझणीत मसालेदार चमचमीत. पण सतत ते खाऊन पोटातले 'गुड बॅक्टेरिया' मरायला लागतात. आणि तब्येत बिघडते.
३. मुलं घरोघरची लठ्ठ होत आहेत. जरा चाललं की दमतात, हवा बदलली की आजारी पडतात. आणि त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे नुकताच प्रसिध्द झालेला एक अभ्यास सांगतो की भारतात फॅटी लिव्हरचा आजार सुमारे ३५% भारतीय मुलांना आहे. लठ्ठ नसलेल्या काही मुलांचे लिव्हरही सुजलेले असते.
४. म्हणजे जो आजार काही मोठ्यांना दारु प्यायल्यानं होतो तसाच आजार लहान मुलांना होतो, लठ्ठपणा, दम लागणं, लिव्हरचा आजार, केस पांढरे होणं, पित्त होणं. डायबिटिस होणं, असे त्रास सुरु होतात. खेळायच्या वयात आजारी पडणारी मुलंच जास्त.
५. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्मोनल बदलाच्या वाढीच्या वयात सतत तेलकट मसालेदार खाल्ल्यानं मुलांचे मूड्सही बदलतात, अभ्यासातलं लक्ष हरवतं. इम्युनिटीही कमी होते.
मग काय बाहेरचं खायचंच नाही की काय?
कोण म्हणतं खायचं नाही.
पण त्याचं प्रमाण किती? त्यावर होणारा खर्च किती याचं गणित जर मुलांनीच मांडलं तर त्यांच्या लक्षात येईल की आपण आपला (तेच म्हणजे आईबाबांचा) पैसा कसा वाया घालवतो आहोत.
त्यामुळे कधीतरी आठवड्यातून एकदा, महिन्यातून दोनदा असं ठरवून हॉटेलातून आणून काही खाल्लं आवडीचं तर बिघडत नाही.
आईबाबाही आनंदानं मुलांना आवडीचे पदार्थ खाऊ देतील, पण रोजच घे मोबाइल कर स्वाइप, कर क्लिक, कर ऑर्डर, कर पेमेंट हे म्हणजे पैसे दुसऱ्याचे आणि उडवतो तिसराच.
सहज विचार करा, उद्या तुमच्या मोबाइलवरुन तुमचे पैसे खर्च करुन आईबाबांनी वाट्टेल तसा खर्च केला तर तुम्ही काय कराल?

विराटच्या उकडलेल्या भाज्या, हार्दिकची खिचडी..
तुझे पैसे आम्ही असे उडवले तर चालेल का तुला असं अर्णवला आईनंही विचारलंच तर तो भडकलाच.
आई काही सांगू लागली तर म्हणाला, मोटिव्हेशन नको.
खरंय त्याचं मोटिव्हेशन नाही ॲक्शन आयुष्य बदलते.
एक जाडजूड चब्बी चिक्स मुलगा वाट्टेल ते खायचा, दारुही प्यायचा. मग एकदिवस त्यानं सगळं सोडून साधं घरचं जेवण, उकडलेल्या भाज्या खाणं सुुरु केलं.
ट्रेनिंग केलं. आता लोक त्याला किंग कोहली म्हणतात.
दुसरा हार्दिक पांड्या. तो आपला कूक बरोबर घेऊन फिरतो. आणि रोज रात्री तो स्वयंपाकी केवळ त्याच्यासाठी गरम खिचडी, बाजरीची भाकरी, ताक-तूप असा बेत करतो.
आता सांगा, विराटला आणि पांड्याला परवडत नसेल का ऑर्डर करणं.
तरी ते घरचं खातात... उगीच का स्टार झाले?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


