नळाचा वाॅशर अन बल्ब बदला..किरकोळ दुरुस्ती करायला शिका!

मी काय करु?

- गौरी पटवर्धन

Image: freepik

आपल्या घरात जशा खेळण्या नादुरुस्त होतात तशा घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तूही नादुरुस्त होत असतात. वस्तू खराब झाली की जा दुकानात. नवीन आणा नाहीतर जुनी दुरुस्त करुन घ्या यासाठी खूप धावपळ करावी लागते. त्यातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं सोडून द्या, पण निदान बाकी किरकोळ वस्तू तरी तुम्हाला दुरूस्त करता येतील का? उदाहरणार्थ, कुकरची रिंग दुकानातून बदलून आणता येईल का? नळाचा वॉशर बदलता येईल का? बल्ब बदलता येईल का? ही कामं वर वर बघता मोठ्यांची वाटतात. पण यातली बरीच कामं लहान मुलंही शिकून घेऊन करू शकतात. त्यासाठी फार हत्यारे लागत नाहीत आणि थोड्या सरावाने तुम्हाला ही कामं सहज जमतील. आणि समजा तुम्ही ही कामं करण्यात पुढाकार घेऊन मदत केली तर आई बाबांनाही तुमचं कौतुकच वाटेल. सोबत हे करत असताना दुरुस्तीचं मोठं कौशल्य तुम्ही शिकू शकाल. यातून घरातल्या सगळ्यांचाच वेळ वाचेल आणि पैसेही.

हेही वाचा!

बिघडलेली खेळणी दुरुस्त करायला शिका!

घरातल्या नादुरुस्त वस्तू दुरुस्त करण्यासाठी काय काय लागतं? तर पक्कड, नोज पक्कड, पाईप रेंच किंवा पोपट पाना, प्लस आणि मायनस स्क्रू ड्रायव्हर, रावळ प्लग्ज आणि हातोडी. यातली बरीच हत्यारे घरात असतात. ही हत्यारे वापरायची कशी हे घरातली मोठी माणसं तुम्हाला सहज शिकवू शकतात. सुरुवातीला कोणा मोठ्या माणसाबरोबर या गोष्टी कशा करायच्या हे समजून घेतलं तर पुढच्या वेळी घरात काही नादुरुस्त झाल्यावर पहिली हाक तुम्हाला मारली जाईल यात काही शंका नाही. पण वस्तू दुरूस्त करण्यात हत्यार आणणं आणि ती वापरायला शिकणं यापेक्षा जास्त अवघड काय असतं माहितीये? कुठलीही वस्तू टाकून देण्यापूर्वी ती दुरूस्त होते का असा विचार मनात येणं. कारण एवढा उद्योग करण्यापेक्षा नवीन वस्तू विकत आणण सोपं वाटतं. तरीही चिकाटीने जुनी वस्तू दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact