मेंदूची सिक्रेटस
- डॉ. श्रुती पानसे

आपण रोज मऊ गादीवर झोपतो, त्या गादीच्या आत काय असतं ते तुम्हाला माहिती आहे का? खूप सारा कापूस पिंजून घेतलेला असतो आणि त्याच्यावर एक छान खोळ शिवलेली असते. आपल्याला गादी म्हणजे एक खोळ वाटते. पण खरं म्हणजे त्या खोळीच्या आत जो मऊ कापूस असतो तो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो.
अगदी तसंच आपल्या संपूर्ण शरीरामध्ये खूप वेगवेगळे अवयव ठेवलेले आहेत आणि त्याला कव्हर म्हणून त्वचा आहे. आपल्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा अवयव असतो. आपल्याला तो दिसत नाही पण पण प्रत्येक क्षणी अगदी झोपेतसुद्धा तो त्याचं काम करतच असतो. एकप्रकारे संपूर्ण शरीराला नियंत्रणात ठेवण्याचं काम मेंदूच करत असतो.
खूपच कठीण, टणक अशा कवटीमध्ये हा मेंदू बसवलेला असतो. मेंदूमध्ये भरपूर पाणी असतं. मेंदूभोवती एक द्राव असतो. हा द्रावसुद्धा अनेक प्रकारची महत्त्वाची कामं करत असतो. आयुर्वेदात तर म्हटलंय, की मेंदू हा भिजलेल्या तुपाच्या गोळ्यासारखा दिसतो.
या मेंदूमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना नियंत्रणात ठेवण्याचं काम जसं चालतं तसंच आपले विचार, आपल्या भावना, आपल्याला मिळत असलेली माहिती याचं वर्गीकरण करण्याचं अगदी छान कामसुद्धा इथेच चालत असतं. कान, डोळे, नाक, त्वचा आणि जीभ ही आपली पंचेंद्रिय आहेत... त्यांचं हेड ऑफिस म्हणजे मेंदू असतो.
कधीही दिसत नसला तरी मेंदू हा आपल्या प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा आहे, कळलं ना आता तुम्हाला?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


