मला काय हवं काय नको? असा प्रश्न स्वत:ला विचारता का?

Image: freepik

मिनिमलिझम या कल्पनेची सध्या जगभर खूप चर्चा सुरु आहे. मिनिमलिझम म्हणजे आपल्याला खरंच कुठल्या वस्तू लागतात ते बघून तेवढ्याच वस्तू ठेवणं. आणि बाकीच्या सगळ्या चक्क देऊन टाकणं. त्याला एक साधा नियम लावायचा. आपण गेल्या एक वर्षात जी वस्तू वापरलेली नाही, ती सरळ देऊन टाकायची. तुमच्याकडे अशी अनेक खेळणी असतील जी तुम्ही केव्हातरी फार आवडीने आणलेली असते. पण कधीतरी त्या खेळण्यातलं नावीन्य संपतं किंवा तुम्ही मोठे होता आणि तुम्हाला तो खेळ खेळायला मजा येत नाही. असे अनेक खेळ घरात उगाच पडून असतात. ते खराबही होत नाहीत आणि वापरलेही जात नाहीत. कोणी कोणी भेट म्हणून दिलेल्या अनेक रंगपेट्या असतात, लहान मोठी दप्तरं असतात, टोप्या, स्पिनर्स, बेब्लेड्स किंवा भोवरे असल्या अनेक वस्तू आपण साठवून ठेवलेल्या असतात. त्या आपण वापरणार नाही हे लक्षात घेऊन त्या वस्तू देऊन टाकणं म्हणजे मिनिमलिझम.

मिनिमम किंवा कमीत कमी वस्तूंमध्ये स्वतःच्या गरजा भागवणं म्हणजे मिनिमलिझम. एकदा तुम्हाला नको असलेल्या वस्तू बाहेर काढणं जमलं की आपल्याला खरंच कसली गरज आहे याचा अंदाज येईल आणि मग पुढच्या वस्तू घेण्याच्या वेळी तुम्ही हट्ट करण्याच्या आधी थोडे थांबून आपल्याला त्या वस्तूची खरंच गरज आहे का याचा आधी विचार कराल. असं केल्याने दोन फायदे होतात. एक म्हणजे आपलं घर स्वच्छ राहतं आणि दुसरं म्हणजे असं सगळ्यांनी केलं, तर अनावश्यक वस्तूंचं उत्पादन कमी होऊन पृथ्वीलाही त्याचा फायदाच होईल.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact