माझ्या आजूबाजूला माणसं असूनही मला एकटं पडल्यासारखं का वाटतं?

Image: freepik

मला कायम एकेकटं वाटतं. घरी आणि शाळेतही. सर्वबाबतीत मला गोंधळल्यासारखं होतं, मी काय करु?

- एक विद्यार्थी

- आपल्या आजूबाजूला माणसं असूनही कधी कधी आपल्याला एकेकटं वाटू शकतं. आपल्या आजूबाजूची माणसं मस्त आनंदात असतात, कोणत्या ना कोणत्या कामात गढलेली असतात. पण आपल्यासमोर खूप काही करण्यासारखं असलं तरी कशातच मन लागत नाही. काय करावं, कसं करावं असा गोंधळ उडालेला असतो. तुझ्याबाबतीतही तसंच झालं असेल. पण हा एकटेपणा दूर करण्यासाठी, आलेला कंटाळा, मनातला गोंधळ घालवण्यासाठी आता तुला स्वत:लाच प्रयत्न करायला हवेत.

- शाळेत मित्रमैत्रिणी आपल्याशी कधी येवून बोलतील याची वाट न पाहाता तू स्वत:हून त्यांच्याशी बोल. शाळेत मधल्या सुटीत, खेळाच्या तासाला मित्र मैत्रिणींच्या ग्रूपमध्ये राहा. एकटं वाटून बाजूला बसण्यापेक्षा खेळामध्ये सहभागी हो, ग्रूप ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात कर.

- शाळेत तू कायम चेहरा पाडून वावरलास तर कोणालाच तुझ्याशी येवून बोलावंसं वाटणार नाही. मित्र मैत्रिणींच्या विशिष्ट वागण्याने एकटेपणा वाटत असेल तर शिक्षकांशी बोलून त्यांची मदत घे.

- घरी आल्यावर बंद खोलीत बसण्यापेक्षा माणसांमध्ये बस, आपोआपच कोणीतरी काहीतरी तुझ्याशी बोलेल. तुला कोणीतरी प्रश्न विचारेल. त्यानिमित्ताने तुझा घरातल्यांशी संवाद सुरु होईल.

- घरात भावंडांशी खेळ. त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत कर, किंवा तुम्ही एकत्र मिळूनही अभ्यास करु शकता. किंवा एकत्र बसून चित्रं काढल्यास गोष्टी वाचल्यास की तुझं मन आणि मूड एकदम फ्रेश होऊन जाईल.

- घरात आईबाबांना मदत कर. मिळून सर्वजण काम करत असतील तर तूही त्यांच्यात सहभागी होऊन कामाची मदत कर. यामुळे आपण काहीतरी करतो आहोत याचा तुला आनंद वाटायला लागेल. घरात आपली दखल घेतली जात आहे हे तुला जाणवेल

- एकटं वाटतं म्हणून उदास बसण्यापेक्षा तुला जे आवडतं ते करण्यात मन रमव.

- तुझ्या मनात जे काही सुरु असेल त्याबद्दल आई बाबांशी किंवा घरात, शाळेत ज्यांच्यावर विश्वास असेल त्याच्याशी मोकळेपणानं बोल. एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी कोणाची मदात हवी असल्यास ती तू अवश्य मागायला हवी.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact