घोडे उभ्या उभ्या झोपू शकतात! पण ते खाली कसे पडत नाहीत?

Image: livescience

बसल्या बसल्या आपल्याला अनेकदा झोप येते. आपल्याला डुलक्या यायला लागतात. मग आपला तोल जावू लागतो. शांत झोपायचं असेल तर मग आपल्याला पलंगावर झोपण्याशिवाय पर्याय नसतो. बसल्या बसल्या शांत झोपता येणं आपल्याला शक्य नसतं मग उभ्या उभ्या झोपता येण्याचा तर प्रश्नच नाही. माणसांना जरी उभ्या उभ्या झोपता येत नसलं तरी काही प्राण्यांना मात्र उभ्या उभ्या छान झोपता येतं. उभ्याने झोपलं तरी त्यांचा तोल जावून ते खाली पडत नाही. घोडे, जंगली बैल  (बायसन) झेब्रा, हत्ती हे प्राणी उभ्या उभ्या झोपू शकतात. गायी देखील उभ्याने झोपत असल्या तरी त्यांना खाली बसून झोपायलाही आवडते. जिराफही उभ्याने झोपू शकतात पण फारच थोड्या वेळासाठी.

प्राणीच नाही तर काही पक्षी देखील उभ्या उभ्या झोपू शकतात. अनेक पक्षी झाडांवर आपल्या झोपण्याची व्यवस्था करतात. त्यासाठी त्यांच्या पायात असलेल्या पट्टीचा उपयोग करतात. या पट्टीद्वारे ते शरीराचं वजन पेलतात आणि नखांनी फांदी लाॅक करतात. त्यामुळे पायावर उभं राहून ते जेव्हा झोपतात तेव्हा त्यांचा तोल जावून ते खाली पडत नाही.

हेही वाचा!

घोडे उभे राहून कसे झोपतात?

घोडे हे प्रामुख्याने उभ्या उभ्या झोपण्याच्या वैशिष्य्ट्यानेही ओळखले जातात. घोडे हे शिकारी प्राणी म्हणजे खाण्यासाठी म्हणून इतर मोठे प्राणी घोड्यांचा वापर करतात. त्यामुळे घोड्यांना सदैव विशेषत: जंगली भागात असताना त्यांना सजग आणि सावधान राहावं लागतं. घोडे उभ्याने झोपतात. त्यांना जरा जरी धोक्याची जाणीव झाली की ते लगेच तिथून पळून जावून स्वत:ची सुटका करुन घेतात. उभे राहून झोप काढण्याच्या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे त्यांच्यावर आक्रमण करु पाहणाऱ्या प्राण्यांना घोडे हे सावध असल्याचा भास होतो. घोडे उभ्याने झोपलेले असले तरी त्यांची ऐकण्याची क्षमता मात्र काम करते. त्यामुळे त्यांना धोक्याची जाणीव लगेच होवू शकते.

झोपलेल्या अवस्थेत शरीराचे स्नायू हे शिथील होतात. जे माणसांच्या बाबतीत होतं तेच प्राण्यांच्या बाबतीतही होतं. पण स्नायू शिथील झाले तरी उभ्याने झोपलेले घोडे खाली पडत नाही. ते त्यांच्या गुडघ्यातील सांध्यामुळे. या सांध्यात एक 'लाॅक सिस्टीम' असते. त्यामुळे  घोड्यांचय मांडीचे स्नायुंना आराम मिळतो आणि त्यांचा तोलही सांभाळला जातो.

उभ्याने झोपलेले असताना त्यांच्या गुडघ्याची वाटी मांडीच्या स्नायुंना लाॅक करते. त्यामुळे स्नायू न आखडताही घोडे उभ्याने झोपू शकतात.

घोडे जेव्हा उभ्याने झोपलेले असतात तेव्हा दर १० मिनिटांनी ते आपल्या पायाची लाॅक सिस्टीम बदलतात. एकदा एका पायाची लाॅक सिस्टीम दहा मिनिटानंतर दुसऱ्या पायाची लाॅक सिस्टीम अशी लाॅक सिस्टीमची अदलाबदल चालू असते.

घोडे दिवसातून ५ ते ७ तास झोपतात. घोड्यांना किती झोप आवश्यक असते ते घोडे किती तरुण आहेत यावर अवलंबून असते. जे घोडे छोटे असतात, वयाने अगदीच तरुण असतात त्यांच्यात खूप ऊर्जा असते. अशा घोड्यांना वयस्कर घोड्यांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते.

झोपे व्यतिरिक्त विशिष्ट वेळेनंतर घोड्यांना आराम हवा असतो. चरणे, इतर घोड्यांमध्ये मिसळणे किंवा एकांतात चालणे हे घोड्यांच्या आरामाचं स्वरुप असतं.

गाढ झोपायचं असेल तर घोडे खाली बसून झोपतात.

Image: petkeen

माणसाला जशी शांत झोपेची आवश्यकता असते तशीच घोड्यांना देखील असते. अशी झोप न मिळाल्यास घोड्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो आणि घोडे आजारी पडतात. घोड्यांची झोप कशी झाली आहे यावरच रेसमध्ये त्यांचं पळणं , कसरतीत उड्या मारणं यातली त्यांची कामगिरी अवलंबून असते. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact