
मला चार वर्षांची लहान बहीण आहे, तसे मित्रमैत्रिणीही खूप आहेत पण आईबाबा सारखे मला बहिणीशीच खेळ, तिला सांभाळ असं म्हणतात. पण मला बाहेरच्या मुलामुलींबरोबर, माझ्या मित्र मैत्रिणींसोबतही खेळायचं असतं. पण नाही खेळता येत. मी काय करु? मी काय करु?- अनुष्का
तुझी छोटी बहिण चार वर्षांची आहे म्हणजे खरं तर ती फार लहान नाही, तू अधुनमधुन तिला घेऊनही तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला जाऊ शकतेस. किंवा कधीतरी तुझ्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवू शकतेस, म्हणजे तुमचं खेळून होईल आणि तुझी बहीण आजूबाजूलाच असेल तर ती तुमच्याशी खेळेल आणि तुमचंही तिच्याकडे लक्ष राहील.
पण असं असलं तरी तुला तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर एकटीलाही खेळायला जायला मिळायला हवं हे बरोबर आहे. त्यामुळे आईबाबा घरी असतील तेव्हा तू तुझं तुझं खेळायला जाऊ शकतेस. आईबाबा त्याला परवानगी देतील, पण जर ते नाही म्हणत असतील तर तू त्यांच्याशी बोल, तुला खेळायला जायचं आहे आणि तुझ्या मित्रमैत्रिणींशी खेळताना बहिणीकडे लक्ष ठेवण्याचं टेन्शन तुला नको आहे हे त्यांच्या लक्षात आणून दे, म्हणजे त्यांना तुझं म्हणणं नक्की पटेल.
तुझी छोटी बहीण तुझ्याशिवाय इतर कुणाकडे राहाते? कुणाशी खेळते? त्यांच्याबरोबर बहीण खेळत असेल तेव्हा किंवा ती दुपारी झोपत असेल तर त्या वेळेत तू तुझ्या मित्रमैत्रिणींशी खेळू शकतेस का याचा अंदाज घे आणि वेळ काढ.बहिणीला सांभाळताना तिच्याशी तू काय काय खेळू शकतेस याचाही विचार कर. तिच्याबरोबर गप्पा, गाणीगोष्टी सांगणं, पुस्तकं वाचणं, वाचून दाखवणं, कधीतरी टीव्हीवरचं कार्टून चॅनल तिच्याबरोबर बसून बघणं असंही तुम्ही दोघी मिळून करु शकता आणि आईबाबा याला नक्की परवानगी देतील.
याव्यतिरिक्त तू आणखी काय काय केलंस? बहिणीशी खेळणं, तिला सांभाळणं आणि मित्रमैत्रिणींबरोबर खेळणं यासाठी कसा मार्ग काढलास आम्हाला नक्की कळव.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


