परीक्षेत सोप्या प्रश्नाचंही उत्तर चुकतं! माझ्याकडून सीलिमिस्टेक्स का होतात?

Image: freepik

आपल्याला पेपर छान गेलाय असं वाटत असतानाच आपण केलेल्या चुका लक्षात यायला लागतात. येत असलेले प्रश्न सोडवतानाही आपल्या हातून चुका का होतात? हे टाळता येणं शक्य आहे का?
- शौर्य देवरे, जानकाई विद्यालय, कळवण

पेपर सोडवून घरी आल्यावर आपण प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेत काय लिहून आलो हे आठवायला लागतं. ज्या प्रश्नांची उत्तरं आपण छान लिहिली आहेत असं आपल्याला 100 टक्के वाटत असतं नेमकं त्याच प्रश्नांच्या बाबतीत काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात येतं. घाईगडबडीत आपण केलेल्या चुकांमुळे आपले हातचे मार्क्स गेलेत अशी हळहळ वाटायला लागते. आपल्या हातून सोप्या प्रश्नांच्या बाबतीत अशी मुर्खासारखी चूक झालीच कशी असा प्रश्न पडून आपल्यालाच आपला संताप यायला लागतो. पण पेपरमध्ये अशा चुका होण्यास एक नाही तर अनेक कारणं जबाबदार असतात.

- परीक्षा हाॅलमध्ये आपण जेव्हा बसलेलो असतो तेव्हा हातात पडणारी प्रश्नपत्रिका कशी असेल याची उत्सुकता तर असतेच सोबतच भीतीही वाटत असते. प्रत्यक्षात हातात प्रश्नपत्रिका पडल्यावर ती जर खूपच सोप्पी असेल तर आपण खूपच एक्साइट होतो. आपल्याला सगळंच येतंय असं वाटायला लागतं. काय लिहू आणि काय नको असं होऊन जातं. या एक्साइटमेंटमध्ये प्रश्नपत्रिका लक्षपूर्वक वाचणं, काय विचारलंय ते आधी समजून घेणं या गोष्टी होत नाहीत. प्रश्न समजण्यात गडबड होते आणि चुका होतात. ही गोष्ट अनेकांच्या बाबतीत होते कदाचित तुझ्याही बाबतीत असंच काही होत असावं.

- पेपर सोडवताना मन शांत ठेवणं आवश्यक असतं. पण तुझ्या मनात समजा पेपरची भीती असेल, अस्वस्थता असेल, भलतेच विचार सुरु असतील तर पेपर सोडवण्यावर तुझं लक्ष एकाग्र होत नाही. आणि सोपे वाटणारे प्रश्न सोडवतानाही तुझ्याकडून चुका होऊ शकतात.

- तू प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर पेपर कसा सोडवायचा याचं नियोजन करतोस का? म्हणजे प्रश्नपत्रिकेतलं आपल्याला काय काय सोडवता येतं, कुठला प्रश्न सोडवताना किती वेळ द्यायचा हे ठरवणं. छोटे प्रश्न सोडवताना तू जास्त वेळ देत असशील तर मोठे प्रश्न सोडवायला तुला वेळच उरत नसणार. यामुळे तारांबळ उडून घाईगडबडीत पेपर सोडवताना चुका होत असतील.

- परीक्षेच्या आधी आणि पेपर सोडवताना तुझ्याकडून यातल्या काय काय चुका होतात याचा बारकाईने विचार कर आणि येत्या परीक्षेत या चुका टाळण्याचा प्रयत्न कर.बघ,तुला हे नक्की जमेल!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact