प्रत्येक गोष्ट मी परफेक्टच केली पाहिजे असा काही नियम आहे का? परफेक्ट म्हणजे नक्की काय?

Image: freepik

प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असणं गरजेचं आहे का?
- दिग्विजय देशमुख, इयत्ता 7 वी, पायोनिअर इंटरनॅशनल सीबीएसएई स्कूल, भोकरदान

- परफेक्ट असं काही नसतं. काय आणि किती केलं म्हणजे परफेक्ट हे मोजण्याचं काही एकक नाही. जे तुला परफेक्ट वाटेल ते इतरांना वाटेलच असं नाही. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातले परफेक्ट हे वेगवेगळे असते. परफेक्ट मोजण्याचं काही साधनच नसेल तर मग आपण जे केलं ते परफेक्ट आहे हे ठरवायचं तरी कसं? हे ठरवणंच अवघड आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्यापेक्षा ती चांगली, छान, उत्तम करण्याचा तू प्रयत्न करायला हवा.

- कोणीही प्रत्येक कामात परफेक्ट नसतं. एकदा का आपण अमूक गोष्ट मी परफेक्ट केली असा शिक्का मारुन घेतला की त्याच्यात उत्तम करण्याची, त्यासाठी शिकण्याची, धडपड करण्याची तळमळ कमी होते. आणि म्हणूनच मोठमोठे गायक, नर्तक, अभिनेते, खेळाडू हे आपण उत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो असंच म्हणतात. आपला परफाॅर्मन्स परफेक्ट होता असं ते कधीच म्हणत नाही. कारण कितीही चांगलं केलं तरी काही ना काही कमतरता किंवा उणीव राहू शकते, कोणीतरी आपल्यापेक्षा चांगलं करु शकतं याची त्यांनाही जाणीव असते.

- प्रत्येकच काम मी परफेक्टच करणार असा हट्ट तू धरला तर मग ते काम करण्याच्या प्रक्रियेतला आनंद तुला घेताच येणार नाही. यामुळे काम परफेक्ट करण्याचा ताण येईल. आणि ते जर तसं झालं नाही तर तुला त्याचं दु:ख होईल, निरशा येईल. ते काम पुढे करण्याची तुझी इच्छाच संपून जाईल. मग अशा परफेक्शनचा आग्रह धरण्याचा काय फायदा? त्यापेक्षा आपण जे करु ते चांगलं आणि उत्तम करण्याचा प्रयत्न करु. यापूर्वी ते करताना ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका टाळू असं तू ठरवायला हवं

- आपण माणूस आहोत, यंत्र नाही हे आधी तू लक्षात घे. काम करताना चुका होणारच. या चुकांमधून शिकत शिकत ते काम मग उत्तम जमायला लागतं. हीच तर शिकण्यातली गंमत असते. तू जर फक्त परफेक्शनचाच आग्रह धरला तर ही गंमत हरवून जाईल.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact