मेंदूचे सिक्रेटस
- डाॅ. श्रुती पानसे

आपल्याला अशी सवय असते की आपल्या शिक्षकांनी, पालकांनी, पाठ्यपुस्तकांनी किंवा प्रश्नपत्रिकेनी तयार केलेले प्रश्न असतात आणि आपण त्यांची उत्तर देतो.
आता आपण गंमत म्हणून हीच गोष्ट उलटी करूया. म्हणजे आता तुमच्याकडे नवीन पाठ्यपुस्तक आली असतील. या पाठ्यपुस्तकातलं कोणत्याही एका विषयाचे पुस्तक निवडायचं. अर्थातच गणित सोडून.
त्यातला पहिला परिच्छेद वाचायचा. त्यात एखादी महत्त्वाची माहिती दिलेली असते. ही दिलेली माहिती म्हणजेच आपलं उत्तर आहे. असं एखादं उत्तर त्यात शोधायचं आणि त्या उत्तराला योग्य असा प्रश्न तयार करायचा. प्रत्येक परिच्छेद वाचून हेच करायचं. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे प्रत्येक परिच्छेदावर किमान एक प्रश्न तयार होईल.
या तयार झालेल्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्याचं काहीच कारण नाही. आपल्याला फक्त प्रश्न तयार करायचे आहेत . कारण उत्तर आपण आधीच पुस्तकामध्ये वाचलेलं आहे.
ज्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेमध्ये चूक की बरोबर, एका शब्दात उत्तरे द्या, एका वाक्यात उत्तरे द्या, दोन ते तीन वाक्यात उत्तरे द्या, जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा, पाहुणा ओळखा अशा पद्धतीचे विविध प्रश्न असतात , तसेच प्रश्न आपल्यालाही काढायचे आहेत.
यातून आपल्याला गंमत येईल ,अभ्यास होईल आणि शिवाय प्रश्नांचे उत्तर देण्याची गरजच नाही. अशा प्रकारचा वेगळ्या पद्धतीने केलेला सराव मेंदूलासुद्धा चक्रावून टाकेल आणि मेंदूला नवीन वेगळ्या प्रकारचं आव्हान मिळेल. एरवी प्रश्नांची उत्तरं धडा वाचून शोधताना, ती लिहिताना हे अवघड काम आहे असं वाटायचं. पण उत्तरं डोळ्यासमोर असताना त्यासाठीचा प्रश्न तयार करणं हे खरंच किती आव्हानात्मक काम असतं याचा अनुभव या प्रयोगातून नक्की मिळेल!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


