सुटीतला भन्नाट टाइमपास म्हणजे मोठ्यांना घर आवरायला मदत करा

Image: .freepik

तुम्हाला टाइमपास सांगू का एक? भारी आयडिया आहे. म्हणजे आपला वेळ मस्त जाईल, आपला फायदा होईल आणि शिवाय आईबाबांना असं वाटेल की तुम्ही त्यांना मदत करताय. घरातलं काम करताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घरातल्या अतिशय कामाच्या व्यक्ती आहोत असंही घरातल्या मोठ्यांना वाटेल अशी मस्त आयडिया आहे. सांगू का?

तुमच्या घरात माळा आहे का? किंवा टाकाऊ वस्तू साठवण्याचा एखादा कप्पा किंवा घरातला कोपरा नक्कीच असेल. पण जर माळा असेल तर त्यावर चढून बघा. त्यावर प्रचंड प्रमाणात जुनं, वापरात नसलेलं सामान ठेवलेलं तुम्हाला दिसेल. असंच सामान पलंगाच्या खाली आणि लोखंडी कपाटाच्या वर, घरातल्या कोपऱ्यात किंवा कप्प्यात ठेवलेलंही तुम्हाला दिसेल.

हेही वाचा!

काय करायचं?

तर या सामानाचं सॉर्टींग करायचं. म्हणजे वस्तू निवडून वेगवेगळ्या ठेवायच्या. त्यात काही वस्तू कामाच्या असतात. काही आईबाबांना नको म्हणून त्यांनी ठेऊन दिलेल्या असतात पण आपल्या कामाच्या असतात. आणि काही वस्तू मात्र खरोखर एकदम भंगार असतात.

तर या सगळ्या वस्तू तीन भागांमध्ये वेगवेगळ्या करायच्या. त्यातल्या ज्या वस्तू कामाच्या आहेत, पण बाजूला टाकून दिल्यामुळे तशाच पडल्या आहेत त्या स्वच्छ करा. त्या आईबाबांना द्या. त्यातल्या ज्या वस्तू तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे आहेत त्या काढून घ्या. आणि मग उरलेलं भंगार एका पोत्यात भरा.

 Image:.freepik

इतका वेळ आपण मेहनतीनं काम केलं. आता इथून पुढे तुम्ही किती चांगलं निगोशिएट करू शकता याची खरी परीक्षा आहे. आपल्याला हे सगळं करून झाल्यावर काय पाहिजे आहे? तर हे सगळं भंगार विकल्यानंतर येणारे पैसे आपल्या स्वतःला ठेऊन घेण्याची परवानगी!

त्यात सापडलेल्या आपल्या कामाच्या वस्तू हे बाय प्रॉडक्ट आहे. आणि आपण कशी स्वत:हून, पुढाकार घेवून घर आवरायला मदत केली हे ठसवणं, लक्षात आणून देणंही महत्वाचं आहे. कारण त्यामुळे तुम्ही घरातली एक कामाची आणि महत्वाची व्यक्ती आहात असं घरातल्या मोठ्या माणसांना वाटेल आणि तुम्हाला पुढचे उद्योग करण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता वाढेल.

सगळ्यात महत्वाचं… हा उद्योग आंघोळीच्या आधीच करा. आंघोळ झाल्याच्या नंतर माळ्यावर चढलात तर कदाचित दिवसभर तिथेच बसून राहावं लागू शकतं.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact