सोनं वापरुन चित्र काढणाऱ्या एका चित्रकाराची गोष्ट

चला, चित्रं काढूया!

- आभा भागवत

Image: overstockart

चित्रं काढण्यासाठी कोणी सोनं वापरतं का? पण ऑस्ट्रिया येथील गुस्ताव क्लिम्ट हा चित्रकार आपल्या चित्रात सोन्याचा वापर करायचा. तो कसा?
गुस्ताव क्लिम्ट हा ऑस्ट्रिया देशाचा एक खूप प्रसिद्ध चित्रकार. त्याचे वडील सोन्याचं कोरीवकाम करत. त्यामुळे त्याला त्याच्या चित्रांमध्ये सोनं वापरावंसं वाटलं आणि सहज वापरता आलं. खूप पूर्वी खरं सोनं चित्रात वापरणारे चित्रकार होते. पण गेल्या शंभर दीडशे वर्षांत चित्र काढण्याच्या पद्धतीही बदलल्यात, सोनं महागही पडतं आणि सोनेरी रंग बाजारात तर मिळतोच शिवाय सोनं वाटेल असं रंगकाम करण्याचं कौशल्य चित्रकार सराईतपणे अवगत करतात. क्लिम्टने त्याची सुंदर चित्रं सोन्याच्या वापरामुळे अजूनच खास केली.

हेही वाचा!

रझा मन प्रसन्न करणारे आणि डोळ्यांना आनंद देणारे चित्र कसे काढायचे?

त्याने अनेक माणसांची पोर्ट्रेटस, फुलं, झाडं, निसर्ग याशिवाय विशिष्ट भावना आणि काल्पनिक जग, स्वप्न असे विषय निवडून त्याच्या खास शैलीत चित्रं काढली. माणसांनी घातलेल्या कपड्यांवर तो इतकी नक्षी काढत असे की त्यानेच चित्राला सौंदर्य प्राप्त होई. इथे दिलेल्या चित्रातील बाईचा झगा किती सुंदर आहे बघ. त्यातलेच रंग पार्श्वभूमीला वापरलेत आणि सगळं चित्रच नक्षीदार आकारांनी भरवून टाकलं आहे.
या चित्राची गंमत म्हणजे जेव्हा क्लिम्टला हे चित्र करण्याची विनंती केली गेली तेव्हा त्याने एक वर्षभर चित्राची जवळजवळ १०० स्केचेस केली. आणि त्यानंतर हे चित्र केलं. कसे हे थोर चित्रकार इतके झोकून देतात स्वतःला कामात, हे बघून कमाल वाटते ना? या चित्रातील चेहरा आणि हात तैलरंगांत म्हणजेच ऑईल पेंट ने रंगवले आहेत, कपड्यांमध्ये थोडं चित्रकाम आणि थोडं सोन्याचं काम आहे आणि पार्श्वभूमीला संपूर्ण सोन्याचा पातळ पत्रा लावला आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact