राखाडी अस्वल १४ तासात ४०,००० पतंग किडे फस्त करतो!

Image: mentalfloss

गुदगुल्या करणारं अस्वल आपण झूमध्ये बघितलेलं असतं, गोष्टीच्या पुस्तकात त्याबद्दल वाचलेलं असतं. आपण बघितलेलं अस्वल हे केसाळ आणि काळ्या रंगाचं असतं. प्राणीसंग्राहलयातील हळूहळू आणि जड पावलं टाकत चालणारं अस्वल पाहिलं की किती आळशी असावा हा प्राणी असं वाटतं. आपल्याला या अस्वलाबद्दल एवढंच माहिती असतं. पण त्यापलीकडेही अस्वलाबद्दल सांगण्यासारखं खूप आहे. शिवाय आपण आपल्या देशातील प्राणीसंग्रहालयात जे अस्वल पाहिलेलं असतं त्यापेक्षा वेगळी अस्वलंही जगात आहे. त्यातलीच एक अस्वलाची प्रजाती म्हणजे उत्तर अमेरिकेतील ग्रिझली बिअर. त्यालाच राखाडी अस्वल असंही म्हटलं जातं. या अस्वलाचं दिसणं, वागणं , खाणं-पिणं वैशिष्ट्यपूर्ण असतं. आपण कल्पना करत असलेल्या अस्वलापेक्षा हे राखाडी अस्वल खूपच वेगळं आहे.

हेही वाचा! 

कसं असतं राखाडी अस्वल?

राखाडी अस्वल हे चांगलच मोठं आणि आणि वजनदार असतं. दोन पायांवर उभं राहिलं की हे अस्वल चांगलं ८ ते ९ फूट उंचीचं होतं. वजन ७०० ते ८००  पौंड इतकं असतं. काही नर राखाडी अस्वलांचं वजन १७०० पौंड इतकंही असतं. आता एवढं वजन घेवून हे चालूच कसं शकतं असा प्रश्न पडेल आपल्याला, पण हे अस्वल आपल्या उसेन बोल्ट या वेगवान ॲथलिटपेक्षाही फास्ट आहे. राखाडी अस्वल ताशी ३५ मैल या वेगाने धावतं. त्याच्या पायाचे पंजे मोठे असले तरी हे अस्वल झाडावरही चढू शकतं.

या अस्वलाला खांद्यावर कुबड असतं. हे कुबड म्हणजे अनावश्यक भाग नसून त्याला उपयोगी पडणारा स्नायूच असतो. जोराने पळताना पुढच्या पायांना वेग देण्यासाठी हिवाळ्यात राहण्याची सोय करण्यासाठी गुहा बनवताना जमीन खोदण्यासाठी त्याला या त्याच्या खांद्यावरच्या कुबडाची मदत होते.

Image: mentalfloss

हेही वाचा! 

राखाडी अस्वल हा अमूकच खातो आणि तमूक खात नाही असं काही नाटक करत नाही. हे सर्वभक्षी अस्वल आहे. म्हणजे हे गवत , बेरीज, नट्स, मासे, उंदीर, हरीण खातं . हे अस्वल कुठे राहातं यावर त्याचं खाणं अवलंबून असतं. पण या अस्वलाचा आवडता खाऊ म्हणजे पतंग किडे. हे किडे हा कितीही खाऊ शकतो आणि त्यासाठी कुठेही जावू शकतो. मोनटाना येथील ग्लेशिअर नॅशनल पार्क येथील अल्पाईन पर्वतावर चढून जातात. तिथे १४ तास थांबून ४०,००० पतंग किडे फस्त करुनच खाली उतरतात. एकावेळी खूप खाणं हे या अस्वलांचं वैशिष्ट्य. वर्षातले ८ महिने हे राखाडी अस्वल मिळेल ते भरपूर खाऊन भरपूर चरबी वाढवून घेतो. पुढे चार महिने थंडी पडल्यावर काहीच खायला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं. त्याची सोय ते अशा प्रकारच्या खाण्याच्या सवयीतून लावतात.

एकदा थंडी पडली की मग हे अस्वल त्यांनी खास थंडीतल्या मुक्कामासाठी केलेल्या गुहेमध्ये जावून बसतात. एकद गुहेत गेले की जणू त्यांची समाधीच लागते.  गुंगीत असल्यासारखेच डोळे मिटून ते पडून् राहतात. या काळात ते काही खात नाही, पित नाही. इतकंच काय शी-शू सुध्दा करत नाही.

Image: .pbs.org

राखाडी अस्वलांची संवाद साधण्याची विशिष्ट पध्दत आहे. त्यासाठी ते तोंडावाटे विविध आवाज करुन, शरीराची विशिष्ट हालचाल करुन इतर अस्वलांना आणि इतर प्राण्यांना संदेश देत असतात. ते जेव्हा रागावलेले असतात तेव्हा डोकं मागे पुढे करतात, तोंडावाटे घोरण्यासारखा  आवाज काढतात आणि दातावर दात घासतात. ते त्यांचं डोकं खाली वाकवतात, कान मागे नेतात आणि तोंडं उघडं ठेवतात तेव्हा राखाडी अस्वल आक्रमक झाले आहे हे समजावं.  

आपण जितकं या अस्वलाला ओळखतो त्यापेक्षा कितीतरी वेगळं आहे हे राखाडी अस्वल. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact