भक्ती चपळगावकर

Image: mediashift
आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या सामान्य लोकांमध्येही असे एखादे टॅलेण्ट असते, जे आपल्याला आश्चर्यचकीत करते. असे लोक जगभरात आहेत. या लोकांना शोधून काढून ग्रेट बिग स्टोरी (Great Big Story) ही बहुमाध्यम वाहिनी त्यांच्यावर माहितीपट म्हणजे डाॅक्युमेण्टरी बनवते. या कंपनीचे फिल्ममेकर्स जगाच्या कानाकोपऱ्यातून कहाण्या गोळा करतात. माणसाला प्रेरणा देणाऱ्या आणि आश्चर्यचकित करणाऱ्या पण माहित नसलेल्या गोष्टी आपल्याला या डाॅक्युमेण्टरी फिल्ममधून कळतात. करामती लोक, खाद्यपदार्थ, नवनवे शोध, चमत्कृतीपूर्ण माहिती, प्रेरणादायी गोष्टी या विषयांवर ग्रेट बिग स्टोरी भर देते.
हेही वाचा!
इंटरेस्टिंग माणसांच्या मजेदार गोष्टी
आता ‘द मोस्ट डिटेल्ड पेपर प्लेन इन द वर्ल्ड’ (The Most detailed paper plane in the world) हा माहितीपट घ्या. कागदाचे मॉडेल्स तुम्ही बनवले असतील पण लुका स्टिवर्ट नावाच्या कॅनेडियन माणसाने बनवलेले विमानाचे मॉडेल काही वेगळेच आहे. दिवसा आयटी क्षेत्रात काम करणारा लुका घरी फावल्या वेळात घरी कागदी विमान बनवतो पण असे विमान जगात कुणी बनवले नसेल. उदाहरणार्थ या विमानाच्या स्वच्छतागृहात टिश्यू आहेत आणि खुर्च्यांमध्ये कागदानेच बनवलेल्या खटक्यामुळे त्या चक्क मागे पुढे जातात. या चॅनलवर भारतातल्या रोचक गोष्टींबद्दल अगणित माहितीपट आहेत. दिल्लीच्या हस्तकला वस्तुसंग्रहायलातल्या कॅफे लोटा या वेगळ्या वाटेवरचे उपाहारगृह चालवणाऱ्या उदित माहेश्वरीबद्दलची डॉक्युमेण्टरी अशीच आहे. ‘धिस कॅफे सर्व्हज इंडियन फूड यू हॅव नेव्हर हर्ड ऑफ’ (This cafe serves Indian food you have never heard of) अर्थात या उपाहारगृहात मिळणारे भारतीय पदार्थ तुम्ही आधी चाखले नसतील असे भलेमोठे शीर्षक या मायक्रोडॉक्युमेण्टरीचे आहे. भारतीय जेवण म्हणजे पंजाबी आणि मोगलाई पदार्थ हा समज खोटा ठरवत हे उपाहारगृह ओडिशा, बंगाल, कश्मीर सारख्या प्रांतातले इतरांनी कमी चाखलेले पदार्थ बनवते. वारली आदिवासींकडे बनवले जाणारे पदार्थही इथे मिळतात. अशा शेकडो काय हजारो मायक्रो डॉक्युमेण्टरीज तुम्हाला ग्रेट बिग स्टोरी या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील.
सीएनएन या जागतिक मीडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या ॲंड्र्यू मॉर्स आणि ख्रिस बेरेंड यांनी ही मायक्रो डॉक्युमेण्टरी बनवणारी ‘ग्रेट बिग स्टोरी’ नावाची कंपनी सुरू केली. डॉक्युमेण्टरी म्हणजे माहितीपट हे तुम्हाला माहिती असेलच पण ग्रेट बिग स्टोरी चॅनलवर तुम्हाला मायक्रो डॉक्युमेण्टरी म्हणजे अतिलघुमाहितीपट पाहता येवू शकतात. हे चॅनल किड्स यू ट्यूब, यू ट्यूब, फेसबूक, ट्वीटर वगैरेवर विनामूल्य उपलब्ध आहे. या चॅनलवर तब्बल २६०० व्हिडियोज आहेत. जगातल्या चमत्कृतीपूर्ण, मनोरंजक, माहितीवर्धक गोष्टींचा समावेश या व्हिडियोमध्ये आहे. ग्रेट बिग स्टोरी या त्यांच्या वेबसाइटवर गेलात तर तिथेही या डॉक्युमेण्टरीज बघता येतात.
(यूट्यूब, ट्वीटर किंवा फेसबूकवर The Great Big Story सर्च करा किंवा thegreatbigstory.com वर गेलात तर तिथे हे माहितीपूर्ण आणि मनोरंजक अतिलघुमाहितीपट बघता येतील)
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
bhalwankarb@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact