आईच्या उपासाला द्या मस्त सरप्राईज!

आईचा उपास आहे? मग करा दह्यातला साबुदाणा!

  • आरती परिचारक

Image - Google

घरात कोणाचा ना कोणाचा एक दिवस तरी उपास असतोच. ज्या दिवशी घरातल्या कोणाचा उपास असेल त्या दिवशी आई आदल्या दिवशीच साबुदाणा भिजवते. मग तोच साबुदाणा आपण वापरून मस्तपैकी उपासासाठी थंडगार असा दही साबुदाणा केला तर.. आई पण खुश होईल. तिलाही चवीत आणि कामात बदल होईल. शिवाय गॅस न वापरता करायचा पदार्थ असल्यामुळे आपण तो करताना तिला पण टेन्शन राहणार नाही.

दही साबुदाणा हा पदार्थ अगदी सहज होणारा आहे. पण या पदार्थाची चव ही सगळ्यांना आवडेल अशीच आहे. सोप्पा पदार्थ करुन आईला सरप्राइज देण्याची आहे का तुमची तयारी? मग लागा कामाला... तुम्ही केलेला दह्यातला साबुदाणा खाल्ल्यावर आई तुम्हाला शाबासकी देणार हे फिक्स आहे! शिवाय आई सगळ्यांकडे तुमचं कौतुक करणार ते वेगळंच, लावता पैज? चला तर मग, कामाला लागूया...

दह्यातला साबुदाणा करण्यासाठी एक वाटी भिजलेला साबुदाणा, अर्धी वाटी दही, पाव वाटी दूध, चवीनुसार मीठ, साखर एक मोठा चमचा, दाण्याचं जाडसर कूट, एक हिरवी मिरची, कोथिंबीर, जिऱ्याची पूड एवढं साहित्य लागतं. हे सगळं साधारणपणे आपल्या घरात असतंच. आता दह्यातला साबुदाणा करण्यासाठी एका भांड्यात भिजलेला साबुदाणा घेऊन त्यात दूध, दही, जिऱ्याची पूड, मीठ, साखर घालून दहा मिनिटं मस्तपैकी भिजत ठेवा. नंतर त्यात बारीक चिरलेली मिरची, दाण्याचं कूट, कोथिंबीर घालून व्यवस्थित कालवून फ्रीजमध्ये ठेवून थंड करा.

मस्त गार झालं की आईला द्या! कधीतरी गंमत म्हणून आणि आवडत असेल तर यात तुम्ही सफरचंदाचे तुकडे,  कापलेले ड्रायफ्रूट्स घालू शकता. करुन बघा आणि आईला आवडला का, तिने काय म्हटलं आम्हाला नक्की कळवा.