कुठेही फिरायला जाताना ५ गोष्टी आपण करायलाच हव्यात!

-शिवान दर्डा  

जगप्रवास सगळ्यांनाच करायचा असतो. आणि आपण सगळेच अगदी जगप्रवास नाही, तरी कुठे ना कुठे प्रवास तर करतच असतो. अर्थातच आपण करत असलेल्या प्रवासामुळे पर्यावरणावर काही ना काही परिणाम होतोच. मग तो प्रवास रोजचा घरापासून शाळेपर्यंतचा असू दे नाही तर वर्षातून एकदा करण्याची लांबची राजस्थानसारखी ट्रिप असू दे. पण एकीकडे प्रवासाचा आनंद घेत असतांना त्यामुळे पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी आपण काही प्रयत्न नक्की करू शकतो. 

image : freepik

1.सगळे मिळून करा

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरल्याने इंधनाची बचत होते. कॅब किंवा रिक्षा करण्यापेक्षा बस किंवा ट्रेनने प्रवास करा. यामुळे पैसेही वाचतात आणि रस्त्यावर येणाऱ्या गाड्यांची संख्याही कमी होते.

2.जास्तीत जास्त चाला

जिथे शक्य असेल तिथे सायकलवर किंवा चालत प्रवास करा. एखाद्या मोठ्या शहरात सुद्धा तिथल्या तिथे फिरण्यासाठी सायकल भाड्याने घ्या. यामुळे प्रदूषण तर कमी होतंच, पण आपल्याला व्यायामही होतो. विचार करा, एखाद्या मोठ्या शहरातल्या गल्ल्यांमध्ये पायी फिरतांना जे बघायला मिळतं, ते नुसतं गाडीतून फिरून बघण्यापेक्षा किती भारी असेल.

3.माहिती करून घ्या

राहण्यासाठी हॉटेल निवडतांना पर्यावरणस्नेही हॉटेल निवडा. अशा हॉटेल्समध्ये अपारंपरिक ऊर्जास्रोत वापरलेले असतात, पावसाचं पाणी साठवलेलं असतं. या ठिकाणी राहिल्यामुळे पर्यावरणाचं नुकसान कमी होतं आणि अशा प्रकारच्या व्यवसायाला चालना मिळते. त्यामुळे  जास्त लोक असा व्यवसाय करतात आणि पर्यावरणाचं नुकसान कमी करतात. LEED किंवा त्या प्रकारचं प्रमाणपत्र मिळालेल्या हॉटेल्समध्ये असा विचार केलेला असतो. 

 

हेही वाचा!

दुपारचा खाऊ चला, आज तुमचा तुम्हीच बनवून घ्या पटापट!

image : kalakriti architects

4.कमीत कमी सामान न्या

प्रवास करतांना कमीत कमी सामान घ्या. तुमचं सामान जितकं जड असेल तितकं ते वाहून नेण्यासाठी जास्त इंधन जाळावं लागतं. त्यापेक्षा अगदी महत्वाच्या आणि खरोखर गरज असलेल्या वस्तूच सामानात घ्या. त्याने तुमचा प्रवास जास्त सुटसुटीतसुद्धा होईल.

 

5.स्थानिक वस्तू आणि सेवा घ्या. 

जिथे जाल तिथल्या स्थानिक दुकानांमधून वस्तू विकत घ्या आणि स्थानिक हॉटेल्समध्ये जेवा. कुठेतरी प्रवासाला जाऊन आपल्या शहरात मिळतो त्याच कंपनीचा बर्गर खाण्यापेक्षा तिथले स्थानिक पदार्थ खाण्यात जास्त मजा असते, त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू वाहून नेण्यासाठीच्या इंधनाची बचत होते.

प्रवास करायला मजा येते हे तर खरंच आहे, पण ती मजा करतांना आपण आपली जबादारी ओळखली पाहिजे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि मस्त प्रवास करा.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact