सांगण्याचा,बोलण्याचा अधिकार फक्त मोठ्यांनाच असतो का?

मोठ्यांचं लहान मुलं नेहमी ऐकतात पण लहानांचं मोठे ऐकून का घेत नाहीत?

-अमरावती 

- मोठ्यांनी सांगायचं आणि लहानांनी ऐकायचं, हे असंच अनेक घरात चालतं. यामागे विशिष्ट कारण आहे. मोठ्यांना लहानांना सांगण्याचा अधिकार असतो. हा अधिकार मोठी माणसं अनुभवातून कमावतात. त्यामुळे ते जेव्हा लहानांना काही सांगत असतात त्यापाठीमागे त्यांना अनुभवातून आलेले शहाणपण असतं. त्यांचा अभ्यास असतो. शिवाय प्रश्न, मुद्दे यांच्याकडे म्हणून बघण्याची त्यांची एक नजर असते. या सर्वांचा परिणाम म्हणजे मोठ्यांना असं वाटतं की आपण सांगितलेलं लहान मुलांनी ऐकायलाच हवं.

- मोठ्यांना वाटतं की आपण लहान मुलांना जे सांगणार ते बरोबरच असतं. ते त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते ऐकून घेतलं, त्यापध्दतीने वागलं तर लहान मुलांचंच भलं होणार. त्यांनाच फायदा होणार. हा त्यांचा विचार खरंतर योग्यच. पण हा विचार करता करता लहान मुलांनाही काही सांगायचं असतं, त्यांचंही काही म्हणणं असतं याचा मात्र त्यांना विसर पडतो. हे ते मुद्दाम करतात असं नाही. सवयीने हे होऊन जातं.

- लहानांकडे मोठ्यांच्या तुलनेत कमी अनुभव असले तरी लहान मुलंही अनुभव घेतात. त्यांनाही प्रश्न पडतात. त्यातून त्यांच्या मनातही वेगवेगळे विचार येतात. भावना येतात. त्या व्यक्त कराव्याशा मुलांनाही वाटतं. पण मोठे ऐकून घेण्याच्या तयारीत नसतात. कारण एकच मोठ्यांनी सांगायचं असतं, लहानांनी ऐकायचं असतं. पण अशा वेळेस रागावून, संतापून न जाता आपालं म्हणणं मांडण्याची संधी लहान मुलांनी शोधायला हवी.

- माझं काहीतरी म्हणणं आहे हे शांतपणे मोठ्यांपर्यंत पोहोचवता यायला हवं. ऐकून घेत नाही म्हणून आरडाओरडा करुन सांगण्याचा प्रयत्न केला तर मग लहान मुलांचं मोठे कधी ऐकूनच घेणार नाहीत. मोठे फक्त तुम्ही आरडा ओरडा केलात एवढंच बघणार. मूळ मुद्दा मग बाजूलाच राहणार.

- बोलणं, सांगणं, ऐकणं, ऐकून घेणं या संवाद साधण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मोठे लहान मुलांशी बोलतात, त्यांना काही सांगतात तर तो संवाद असतो. त्यामुळे तो एकतर्फी होऊच शकत नाही. हे मोठ्यांनाही माहिती आहे. त्यामुळे वेळोवेळी मोठे जेव्हा त्यांचं म्हणणं मांडताते तेव्हा आपणही आपला मुद्दा मांडत जायला हवा. लहानांचं मत ऐकून घेण्याची मोठ्यांनाही सवय लागते.

- लहान मुलं जर मोठ्यांशी केवळ तक्रारीच्या सुरात बोलत असतील किंवा हट्ट धरत असतील तर मोठे लहान मुलांना दरडावून सांगण्याची भूमिका घेतात. तेव्हा आपण काय आणि कसं सांगतोय याचा विचार लहान मुलांनीही करायला हवा.

- चांगलं बोलूनही जर मोठी माणसं ऐकण्याच्या तयारीत नसतील तर मग लहान मुलं त्यांना जे सांगायचं आहे ते लिहून मोठ्यांना सांगू शकतात. याचा परिणाम म्हणजे तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे पण ते सांगता आलेलं नाही याची जाणीव मोठ्यांना होईल. एरवी हा/ ही बोलू शकला/ शकली असते पण आपल्यामुळे लिहून कळवावं लागलं याची जाणीव मोठ्यांनाही होईल.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact