एक पुस्तक बोअर झालं तर पुस्तक बदला, पण वाचन सुरुच ठेवा!
गौरी पटवर्धन.

असं कधी झालंय का? की तुम्ही गोष्टीचं पुस्तक वाचायला घेतलं, आणि तुम्हाला फार फार कंटाळा आला. असं झालं असेल तर तुम्ही अजिबात एकटे नाही आहात. खूप मुलांचं पहिल्यांदा पुस्तक वाचतांना असं होतं. त्यामागे खूप वेगवेगळी कारणं असतात. तुम्हाला वाचण्याची सवय नसल्यामुळे तुमचा वाचण्याचा वेग कमी असतो. त्यामुळे पुस्तकातली गोष्ट पुढे सरकत नाही. कधी तुम्ही जी गोष्ट वाचायला घेता ती खरंच फार रटाळ असते. काही वेळा पुस्तक चांगलं असतं, पण विषय तुमच्या आवडीचा नसतो. गोष्टी अनेक प्रकारच्या असतात. भुतांच्या, प्रवासाच्या, चरित्र, आत्मचरित्र, गाड्यांच्या, मित्रमैत्रिणींच्या, आगगाडीच्या, लहान गावातल्या, मोठ्या शहरातल्या, इतिहासाच्या, भविष्यातल्या, वैज्ञानिक अशा तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी पुस्तकांमध्ये असतात. यापैकी आपल्याला काय आवडतं असा विचार करून गोष्ट वाचायला घेतली तर ती आपल्याला आवडू शकते.
पुस्तक वाचतांना लक्षात ठेवण्याची अजून एक गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट आपण सुरु केली म्हणजे ती वाचून पूर्ण केलीच पाहिजे असं नसतं. काही वेळा आपल्याला थोडीशी गोष्ट वाचून झाल्यावर लक्षात येतं, की आपल्याला ती आवडलेली नाही. अशा वेळी चक्क ती गोष्ट ठेऊन द्यावी आणि दुसरी घ्यावी. आपल्याला आवडणारी गोष्ट सापडली की ती आपण आपोआप पूर्ण वाचतोच!
त्याहीपलिकडे एक महत्वाची गोष्ट… तुम्ही जेव्हा सिनेमा बघता, छोटे व्हिडीओ बघता, पॉडकास्ट बघता त्यावेळीही तुम्हाला ते प्रत्येक वेळी आवडतात असं नाही. मग तुम्ही काय करता? तो व्हिडीओ किंवा सिनेमा बंद करून दुसरा लावता. पण चार सिनेमे बोअर निघाले म्हणून सिनेमा बघायचा सोडून देत नाही. तसंच पुस्तकांचं करायचं!


