पाण्यात राहून माशांना कधीच सर्दी होत नाही का? शिंका येत नाही का?

image : drawception

आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी खोकला झालेला असतो. घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटतं, टोचल्यासारखं वाटतं, हुळहुळतं आणि ते घालवण्यासाठी आपण खोकतो. आपल्यापैकी अनेक मुलांनी कुठल्यातरी प्राण्याला खोकताना बघितलं असेल. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, घोडा असे अनेक प्राणी कधी ना कधी खोकल्यासारखं करतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की पाण्यात राहणारे मासेसुद्धा खोकतात?

 

 

 

 

हे वाचा!

स्कॉटलँड या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे... युनिकॉर्न!

जे मासे मुळात हवेत श्वास घेत नाहीत आणि हवेत तो सोडतही नाहीत ते खोकतात म्हणजे काय? आणि कसे? हे समजण्यासाठी आधी हे बघायला पाहिजे की मासे श्वासोच्छवास कसा करतात? तर मासे तोंडाने पाणी आत घेतात आणि कल्ल्यांमार्फत त्यातला ऑक्सिजन काढून घेऊन बाकीचं पाणी परत बाहेर सोडतात. म्हणजेच मासे जरी पाण्याबाहेर राहणाऱ्या प्राण्यांसारखा हवेतून श्वास घेत नसले, तरी शुद्ध पाणी आत घ्यायचं आणि अशुद्ध पाणी बाहेर सोडायचं असा श्वासोच्छवास ते करत असतात. यात त्यांचे कल्ले हा अवयव महत्वाची भूमिका बजावतो. कारण तोंडावाटे आत घेतलेल्या शुद्ध पाण्यातून ऑक्सिजन काढून शरीराला देण्याचं आणि शरीरात तयार झालेला कार्बनडायॉकसाइड पुन्हा बाहेर टाकण्याचं महत्वाचं काम हे कल्ले करतात.

हे वाचा! 

निळं रक्त – तीन हृदय – नऊ मेंदू असलेल्या बुद्धिमान जलचराचं नाव माहितीये का तुम्हाला?

पण काही वेळा या कल्ल्यांमध्ये काहीतरी बारीकसा कचरा अडकतो. किंवा त्यात फार जास्त जंतूंची वाढ होते. त्यावेळी हा अडथळा शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी मासे चक्क खोकतात. म्हणजे एकदम खूप ताकद लावून कल्ल्यातून पाणी बाहेर टाकतात. या एकदम वेगाने बाहेर टाकलेल्या पाण्याबरोबर कल्ल्यात अडकलेला कचरा बाहेर टाकला जातो.

image : freepik

पण त्याचबरोबर अजून एक गंमत आहे. मासे खोकतात, पण शिंकू शकत नाहीत. का माहितीये? कारण शिंकण्यासाठी फुफ्फुसातील हवा जोरात बाहेर टाकावी लागते. आणि माशांना फुफ्फुसं नसतात. त्यामुळे त्यांना शिंकता येत नाही. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact