मी काय करु?
- गौरी पटवर्धन.

आपण दर वेळी हवे असलेले खेळ विकत आणू शकत नाही. शिवाय विकत आणलेल्या खेळण्यांची किंमत कितीही असली तरी आपण त्याच्याशी थोडेसेच दिवस खेळतो. त्यामुळे सारखं सारखं नवीन खेळणी आणण्यासाठी आईबाबांकडे हट्ट करणं बरोबरही नाही. पण मग सुट्टीभर करायचं काय? आहे त्याच ४ खेळण्यांशी खेळायचं का? तर त्यावर एक भारी आयडिया म्हणजे काहीही नवीन वस्तू विकत न आणता खेळणं. म्हणजे कसं? तर त्यासाठी तीन आयडिया असतात.
पहिली आयडिया म्हणजे आपल्याला लागणारे खेळ आपण तयार करायचे. दुसरी आयडिया म्हणजे असे खेळ खेळायचे की त्यासाठी काहीच साहित्य लागत नाही. तिसरी आयडिया म्हणजे घरात असलेलं साहित्य वापरून काय खेळता येईल त्याचा विचार करायचा.
आता आपल्याला लागणारे कुठले खेळ आपण तयार करू शकतो बरं? तर अनेक बोर्ड गेम्स घरी बनवता येतात. सापशिडीचं किंवा ल्युडोचं चित्र काढून तो कागद पुठ्ठयावर चिकटवता येतो. खराब झालेल्या स्केचपेनांची टोपणं सोंगट्या म्हणून वापरता येतात. कार्डबोर्डचे छोटं खोकं बनवून ते फासा म्हणून वापरता येतं. कागदाच्या बोळ्याचे छोटे मोदक करून त्याला फेव्हिकॉल लावून मग रंग लावून त्याच्या सोंगट्या करता येतात. घरात अर्धे हरवलेले दोन चार पत्त्यांचे कॅट असतात त्यातून एक कॅट बनवता येतो किंवा ते सगळे एकत्र करून चॅलेंज सारखे खेळ खेळता येतात. घरातली भांडी वापरून भातुकली आणि उश्या चादरी वापरून घर बनावट येतं. हे खेळ खेळायला मजा तर येतेच पण शिवाय ते खेळ तयार करायला मजा येते ती वेगळी! ही सगळी मज्जा करुन बघणार ना मग?


