आज काय बघाल?
- अर्चना भट

चला, आज चार्ली चॅप्लिनचा सिनेमा बघूया! सिनेमाचं नाव आहे ‘द किड’. सिनेमाची सुरुवात होते, एक बाई आपलं मूल एका महागड्या गाडीत ठेवते तिथून. बाळाबरोबर ‘कृपया ह्या अनाथ मुलाला प्रेम द्या, त्याची काळजी घ्या’ अशी चिठ्ठी सुद्धा ठेवते. दोन चोर नेमकी तीच गाडी चोरून नेतात. गाडीत बाळ आहे लक्षात आल्यावर, बाळाला देतात एका बोळात ठेऊन. काही वेळाने तिथे एक भटक्या, म्हणजेच आपला चार्ली चॅप्लिन फिरत फिरत येतो. त्या बाळाला तो कोणाकोणाकडे द्यायचा खूप प्रयत्न करतो; पण शेवटी त्याच्या बरोबर असलेली चिठ्ठी बघून मुलाला आपल्याच घरी घेऊन जातो. घर कसलं, छोटसं खोपटंच म्हणा ना! त्यातच तो मुलाची सोय लावतो. मुलाचं नाव ठेवतो ‘जॉन’.
म्हणता म्हणता पाच वर्षं जातात. जॉन आणि भटक्या आता एकमेकांबरोबर मस्त राहायला लागलेले असतात. त्या दोघांनी मिळून पैसे कमावण्याची एक शक्कलही शोधलेली असते. एकंदरीत गरिबीतही त्यांचं बरं चाललेलं असतं.
या काळात जॉनची आई प्रसिद्ध नटी झाली असते. ती गरीब मुलांना मदत करत असते. एक दिवस मुलांना खाऊ वाटत असताना, तिला जॉन भेटतो. त्यानंतर एका मागून एक बऱ्याच गोष्टी घडतात. शेवटी काय होत असेल? तिला कळलं असेल का, की तो तिचा मुलगा आहे? तिने जॉनला आपल्या घरी नेलं असेल का? भटक्याचं काय झालं असेल? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सिनेमामध्ये सापडतीलच! हा सिनेमा तुम्हाला यूट्यूब वर सापडेल. नक्की बघा!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


