ध्यानधारणा करणं मुलांना कसं जमेल? ती केल्याने काय होईल?

Image: freepik

आम्ही लहान मुलांनी ध्यानधारणा करणं गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे आहेत?

- श्रेयश माळी, एस. व्ही. एस. अकॅडमी, टेंभूर्णी

- लहान मुलांनी ध्यानधारणा करणं गरजेचं आहे का असं तू विचारलंस तर त्याचं उत्तर नाही असंही असू शकतं आणि केली तरी चालते असंही असू शकतं. पण लहान मुलांनी ध्यानधारणा केली तर त्याचा उपयोग होतो का असं तू विचारलंस तर त्याचं उत्तर मात्र नक्की 'हो' असंच आहे. तुला एक गंमत सांगू का? ध्यानधारणा करणं ही तशी सोपी गोष्ट नाही. मोठ्या माणसांनाही ध्यानधारणा जमायला खूप वेळ लागतो, पण म्हणून लहान मुलांनी ती करण्याचा प्रयत्न करु नये, असं अजिबात नाही. तुझे आईबाबा ध्यानधारणा करत असतील तर त्यांना तुला शिकवायला सांग.

- ध्यानधारणेचे काही फायदे तुला सांगू का? तू शाळेत जातोस आणि अभ्यास करतोस, अभ्यासात लक्ष एकाग्र करण्यासाठी ध्यानधारणेचा तुला उपयोग होऊ शकतो.

- आई तुला कधी म्हणते का? तू खूप चंचल आहेस, जरा एका जागी बसत नाहीस असं? तर मग तुझ्यातला तो चंचलपणा कमी व्हायलाही तुला ध्यानधारणेची मदत होऊ शकते.

- लहान मुलांनाही स्ट्रेस येतो, म्हणजे मोठ्या माणसांसारखा त्यांना तो सांगता येत नाही, पण येतो. तो स्ट्रेस कमी व्हायलाही ध्यान करणं उपयोगी पडू शकतं.

- आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, इतरांबद्दल चांगला विचार करणं या गोष्टीही ध्यान केल्यामुळे तुला जमू शकतात.

- तुला छान, शांत झोप लागते का? सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटतं का? तुझी झोप सुधारण्यासाठीही ध्यानाचा उपयोग होऊ शकतो. कदाचित या सगळ्याचा नेमका अर्थ तुला आत्ता कळणार नाही, पण तू ध्यानधारणा करायला सुरुवात केलीस तर त्यातल्या काही गोष्टी हळूहळू तू मोठा होशील तशा तुला कळायला सुरुवात होईल. तू प्रयत्न करुन बघ आणि तुला जमलं की सांग, म्हणजे तुझ्या मित्रमैत्रिणींनाही ते करुन बघावंसं वाटेल.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact