सायलीच्या आईबाबांनी हे ठरवलं होतं, की भूभूला लांब कुठेतरी सोडून द्यायचं.

ते कुठे सोडायचं हे त्यांना कळेना, म्हणून त्यांनी ज्याच्या ओळखीने त्याला आणलं होतं, त्या जमीरदादाला विचारलं. तर जमीरदादाला फार आश्चर्य वाटलं. कारण त्याला हे माहिती होतं, की आपल्या घरी राहणारं कुत्रं हे आपल्या घरचा सदस्य होऊन जातं. अनेकदा कुत्रं घरातल्या माणसांपेक्षा जास्त लळा लावतं. अशा वेळी आपल्याबरोबर सहा महिने राहणारं कुत्रं यांना का नकोय तेच त्याला कळेना. त्याने विचारल्यावर सायलीच्या आईबाबाने भूभूच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली.
तो कसा घरात शी शू करायचा, सायलीच्या अंगावर गुरगुरतो, फक्त जेवण्यापुरता जवळ येतो आणि परत बाहेर जातो, घराचं दार उघडं सापडलं की घरातून बाहेर निघून जातो इ. इ.
जमीरदादाला अजूनच आश्चर्य वाटलं. कारण घरातलं कुत्रं कधीच असं वागत नाही हे त्याला माहिती होतं. मग त्याने सायलीच्या आईवडिलांना विचारायला सुरुवात केली की पिल्लू घरी आणल्यापासून तुम्ही त्याच्याशी कसे वागलात ते सांगा. मग सायलीच्या आईबाबांनी त्याला हे सांगायला सुरुवात केली की, आमची काहीच चूक नाहीये, आम्ही त्याला वेळेवर खायला घालतो, नेहेमी अंघोळ घालतो, जमेल तेव्हा फिरायला नेतो, डॉक्टरकडे नेतो, त्याला सगळी इंजेक्शन्स वेळेवर दिलेली आहेत. आणि एवढं बोलून सायलीची आई म्हणाली, “आणि खरं सांगू का जमीर? आम्हाला कोणालाही कुत्रं आवडत नाही, तरीसुद्धा आम्ही त्याचं एवढं केलं… अजून काय करायला पाहिजे होतं???”
आता मात्र जमीरदादाला त्यांचा मजबूत राग आलेला होता. आधी आपल्याला कुत्रं आवडत नसतांना, घरात ते कोणालाही नको असतांना पिल्लू घरी आणायचंच कशाला? बरं आणलं तर आणलं, निदान त्याला काय लागतं, त्याच्याशी कसं वागायचं हे कोणाला तरी विचारून घ्यावं… आणि अगदी काहीच नाही, तर निदान एक गोष्ट लक्षात ठेवावी की कुत्रं जिवंत असतं. त्याला पण भावना असतात.
जमीरदादाच्या हे नक्की लक्षात आलं होतं, की सायली आणि तिचे आईबाबा भूभूशी वाईट वागले आहेत आणि आता मात्र ते भूभूकडे बोट दाखवतायत. जमीरदादाला खरं म्हणजे सायली आणि तिच्या आईबाबांचा खूप राग आला होता. त्यांच्यामुळे भूभूची काहीही चूक नसतांना त्याला चिडका कुत्रा ठरवलेलं होतं. पण जमीरदादा शहाणा होता. त्यामुळे चिडून उलट काही बोलायच्या आधी त्याने शांतपणे विचार केला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की जे झालं त्यात सायली आणि तिच्या आईबाबांची एकच चूक झालेली होती. ती म्हणजे त्यांनी कोणालाही आवडत नसतांना कुत्र्याचं पिल्लू घरी आणलं होतं. आणि एकदा घरात कोणालाही कुत्रं आवडत नाही म्हंटल्यावर पुढे जे झालं ते तसंच घडणार होतं.
त्यांनी त्यांच्या दृष्टीने जे महत्वाचं होतं, त्याला खायला प्यायला घालणं, ते व्यवस्थित केलं होतं. पण कुत्र्यालासुद्धा माणसासारखं प्रेम हवं असतं हे त्यांच्या लक्षातच आलेलं नव्हतं. आपण जेव्हा कुत्र्याचं पिल्लू घरी आणतो तेव्हा एखाद्या लहान बाळासारखी त्याची काळजी घ्यावी लागते, त्याच्यावर प्रेम करावं लागतं. नवीन घरी आलेल्या पिल्लाला आपल्या जवळ, आपल्या खोलीत घेऊन झोपायला लागतं. त्याला नवीन घराची सवय झाली की ते त्याच्या त्याच्या जागेवर जाऊन झोपतं. त्याला त्याच्या आईजवळ, उबेत झोपायची सवय असते, त्यामुळे त्याला घरी आणल्यावर निदान पहिले काही दिवस छोट्या खोक्यात किंवा टोपलीत, आत मऊ जुन्या साडीची किंवा ओढणीची घडी घालून झोपवावं लागतं. त्याला आईची फार आठवण आली, तर त्याला काही दिवस झोपायला गरम पाण्याची पिशवी द्यायची असते. त्याच्या उबेत पिल्लू शांत झोपतं. पिल्लू किमान सहा महिन्याचं होईपर्यंत त्याला शी शू कुठे करायची ते समजत नाही. त्याच वयात ते पिल्लाचे दात शिवशिवतात, मग ते बूट, सतरंजी, टेबलचे पाय असं काय वाट्टेल ते कुरतडत. त्याच्याशी रोज खेळायला लागतं, त्याच्याशी गप्पा मारायला लागतात. त्याला भरपूर मोकळी जागा लागते. त्याला त्याची त्याची जागा दिली तरी ते घरातल्या सोफ्यावर, गादीवर येऊन बसतं...
पण या सगळ्याच्या बदल्यात ते आपल्यावर इतकं प्रेम करतं, की आपलं मन भरून जातं. हे सगळं ज्यांना समजतं आणि करायला आवडतं, त्यांनी कुत्रं पाळावं. बाकीच्यांनी कुत्रं पाळू नये. कुत्रं ही काही लहान मुलाच्या हट्टासाठी घरी आणायची वस्तू नाही. तुम्ही कुत्र्यासाठी दहा पंधरा वर्षं रोज काढणार असाल तरच कुत्र्याचं पिल्लू घरी आणावं…
हे सगळं जमीरदादाने सायलीला तिच्या आईबाबांना समजावून सांगितलं, आणि म्हणाला, “पण तरी तुम्ही एक गोष्ट चांगली केलीत. त्याला कुठे सोडून दिलं नाहीत. मी बघतो आता काय करायचं ते.”
जमीरदादाने भूभूसाठी खूप प्रेम करणारं घर शोधलं. त्या घरात भूभू आता मजेत आहे. आता तो कोणावर गुरगुरत नाही.
सायलीलाही तिची चूक समजली आहे. तीही आता वेड्यासारखे हट्ट करत नाही.


