आपण प्लीज कुत्र्याचं पिल्लू आणूया का? – भाग २

सायलीच्या वाढदिवसाचा गोंधळ आवरून सायली आणि तिचे आईबाबा झोपल्यावर भूभूला जाग आली.

images : freepik

एव्हाना त्याची कपाटाखाली छान झोप झाली होती. शिवाय त्याला आता भूक लागली होती आणि शू पण लागली होती. त्यामुळे तो कपाटाखालून बाहेर आला. आणि बाहेर बघतो तर काय? सगळीकडे अंधार! बाहेर आल्यावर त्याने सगळ्यात आधी कार्पेटवर शू केली. आणि मग तो दूधपोळीची बशी शोधायला निघाला. पण ती काही त्याला सापडेना. कारण आईने ती मगाशीच उचलून ठेवलेली होती. आता काय करणार? त्याने परत जोरजोरात ओरडायला आणि रडायला सुरुवात केली.

दमून झोपलेल्या सायलीला तर काही जाग आली नाही, पण तिचे आईबाबा बिचारे धडपडत उठले. झोपेतून असं उठून यायला लागल्यामुळे त्यांनाही भूभूचा राग आला होता. “काय वैताग आहे हे कुत्तरडं म्हणजे!” असं म्हणत सायलीच्या बाबाने त्याला परत थोडी दूधपोळी दिली आणि प्यायला पाणी भरून ठेवलं, आणि परत झोपायला निघून गेला.

भूभूने सगळं जेवण चाटून पुसून साफ केलं. पण आता त्याला खेळावंसं वाटत होतं. मगाशी आपल्याशी खेळणारी ती मुलगी कुठे गेली? असं म्हणून तो घरभर शोधायला निघाला. पण त्याला काही सायली सापडली नाही. मग त्याला एकटं वाटायला लागलं. त्याने परत ओरडायला सुरुवात केली. आता मात्र सायलीची आई चांगलीच चिडली. आधीच तिला घरात कुत्रं नको होतं. त्यात अशी सारखी सारखी झोपमोड व्हायला लागल्याने ती इरिटेट झाली. तिने भूभूला उचललं, हॉलमध्ये नेऊन ठेवलं आणि हॉलचं दार बंद करून घेतलं.

आता काय करावं? भूभूने इकडेतिकडे शोधायला सुरुवात केली. त्याला सगळ्यात आधी सायलीचे नवीन सँडल्स दिसले. ते सँडल्स घेऊन तो खेळत बसला आणि केव्हातरी झोपून गेला. 

सकाळी दूधवाला आला, तेव्हा बाबा झोपेत हॉलमध्ये आला आणि त्याचा पाय पचकन पडला… भूभूने रात्री केलेल्या शीमध्ये!

बाबाचा पाय सकाळी सकाळी भूभूच्या शीमध्ये पडून घाण झाल्यामुळे तोही चिडला आणि त्याने झोपलेल्या भूभूला एक फटका मारला. झालं… भूभू परत रडायला आणि ओरडायला लागला. त्याला हे कळेचना की या लोकांना आपलं काहीच आवडत नाहीये तर यांनी आपल्याला घरी का आणलंय?

इकडे सायलीच्या आईबाबालाही वाटायला लागलं होतं, की आपण सायलीच्या हट्टाला बळी पडून उगीच कुत्रं आणलं. आता त्याचं करणार कोण? भूभूला आणायच्या आधी सायलीने जोरात सांगितलं होतं, की त्याचं सगळं मी करीन. पण तिला शी शू काढण्याची घाण वाटायची, भूभूला खायला घालायचं तिच्या लक्षात राहायचं नाही, तिच्या एकटीबरोबर भूभूला फिरायला बाहेर पाठवायची तिच्या आईबाबांची हिम्मत व्हायची नाही, आणि तिची शाळा, क्लास, मित्रमैत्रिणी यात भूभूशी खेळायला तिला फारसा वेळही व्हायचा नाही. आणि मग ही सगळी कामं आईबाबाच्या अंगावर पडायला लागली.

त्यातल्या त्यात भूभू सहा महिन्यांचा होता होता त्याला हे समजलं की शी शू घरात करायची नसते. त्यामुळे आईबाबाचं तेवढं एक काम कमी झालं. पण एकूणात भूभूशी घरात कोणी प्रेमाने बोलायचं नाही, त्याचे लाड करायचं नाही, त्याच्याशी खेळायचं नाही. त्याला दिवसातून दोन वेळा खायला घालणं सोडून त्याच्याशी कोणीच काही संबंध ठेवायचं नाही.

त्यातल्या त्यात सायली तिला वाटेल तेव्हा येऊन भूभूला चोंबाळायची, त्याला मिठी मारायची, त्याच्या पाठीवर बसायची. पण तिच्या त्या खेळण्याचा भूभूला त्रास व्हायचा. मग तो तिच्यावर गुरगुरायचा. तो गुरगुरतो म्हंटल्यावर ती घाबरून त्याच्या जवळ जाईनाशी झाली आणि भूभू हा एक चिडका कुत्रा आहे असा समज सगळ्यांच्या मनात पक्का होऊन गेला.

एव्हाना भूभूला घरात येऊन सहा महिने झाले होते. नऊ महिन्यांचा भूभू आकाराने पण मोठा झाला होता. सायलीच्या दृष्टीने कुत्र्याचं पिल्लू आणण्यातली गंमत केव्हाच संपली होती, आईबाबांना तर तो मुळात नकोच होता आणि त्यामुळेच एक वर्षाचा व्हायच्या आत, स्वतःची काहीही चूक नसतांना भूभू मात्र बेघर होण्याच्या मार्गावर होता.

सायलीचे आईबाबा त्याला लांब कुठेतरी सोडून द्यायच्या विचारात होते…