सायलीच्या दहाव्या वाढदिवसाला तिला काय गिफ्ट पाहिजे ते तिने आधीच आईबाबाला सांगून ठेवलेलं होतं. आणि ते गिफ्ट मिळत नाही तोवर मला दुसरं काहीच नको, केक नको, फ्रॉक नको आणि मी अभ्यासपण करणार नाही असं म्हणून तिने सॉलिड धिंगाणा घातला होता. तिच्या आईबाबाने, आजीआजोबांनी, आत्या, मावशी, काका, मामा सगळ्यांनी तिला वेगवेगळ्या गोष्टींचं आमिष दाखवलं होतं. पण अंहं! सायली तिच्या मागणीवर ठाम होती. आणि शेवटी, वाढदिवसाच्या आदल्या संध्याकाळी तिचं रडणं थांबेना म्हंटल्यावर आईबाबाने शोधाशोध आणि मग धावपळ करून तिला हवं असलेलं वाढदिवसाचं गिफ्ट शोधून काढलं.

आणि अखेरीस… सायलीच्या दहाव्या वाढदिवसाला… संध्याकाळी… तिचं तीन महिने वयाचं वाढदिवसाचं गिफ्ट कुईं कुईं करत शेपूट हलवत गळ्यात पत्ता बांधून तिच्या घरी आलं. ते कुत्र्याचं पिल्लू बघून सायलीचा आनंद मनात मावेना. ती घाईघाईने पिल्लाला मांडीवर घेऊन बसली. वाढदिवसाचा केले कापतांनासुद्धा तिला ते मांडीवर पाहिजे होतं. ते मात्र आईबाबाने ऐकलं नाही. पण केक कापून झाल्याबरोब्बर तिने त्या कुत्र्याच्या पिल्लाचा पट्टा हातात घेतला आणि ऐटीत त्याला घेऊन सगळीकडे फिरायला लागली. तिने त्या पिल्लाचं नावपण लगेच ठरवून टाकलं, भूभू!
आणि मग भूभूच्या मागे फिरण्यात, त्याच्याशी खेळण्यात सायली इतकी रमून गेली, की ती तिच्या वाढदिवसाला आलेल्या मित्रमैत्रिणींशी सुद्धा फारशी खेळली नाही.
आईशेजारून उचलून आणलेलं ते छोटुस पिल्लू मात्र त्या गोंधळात पूर्ण भांबावून गेलं होतं. त्याला कुठेच त्याची आई सापडत नव्हती. सायलीच्या आईने त्याला बशीत दूधपोळी दिली, पण ती खातांना वाढदिवसाला आलेली सगळी छोटी मुलं आरडाओरडा करत त्याच्या भोवती उभी होती, त्यामुळे त्याला बिचाऱ्याला नीट खाणसुद्धा गेलं नाही. ते कुईं कुईं करून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतं. पण त्याचं म्हणणं काय आहे हे समजून न घेता सारखं त्याला कोणीतरी उचलून घेत होतं.
आणि त्या सगळ्या गोंधळात, माणसांनी भरलेल्या घरात अचानक सायलीचा एक मित्र ओरडला, “ईईईई… सायली, तुझ्या भूभूने शी केली बघ!”
सायलीच्या मित्राने भर वाढदिवसाच्या गर्दीत मोठ्याने ओरडून सांगितलं की सायलीच्या भूभूने शी केली. त्यावर सगळी मुलं हसायला लागली. मग सायलीला तो भयंकर अपमान वाटला. तिला वाटलं, की भूभूमुळे आपले मित्रमैत्रिणी आपल्याला हसले. भूभूने घरात शी करायलाच नको. त्याला एवढं कसं कळत नाही? असं म्हणून तिने रागारागात भूभूला एक फटका ठेऊन दिला.
आधीच भूभूला आपण कुठे आलोय ते कळत नव्हतं. शी कुठे करायची ते त्याला कोणी सांगितलेलं नव्हतं. बरं, कोणी सांगितलं असतं, तरी त्याचा काही उपयोग नव्हता. कारण भूभू अजून छोटा होता. शी शू करायला बाहेर जायचं हे त्याला कोणी सांगितलं असतं, तरी समजलंच नसतं. आणि अशात सायलीने जोरात फटका मारला तो भूभूला जोरात लागला. त्याला एकदम आईची आठवण येऊन रडू यायला लागलं. आणि तो घाबरून क्यांव क्यांव करत कपाटाच्या खाली जाऊन लपला.
ते कपाट चांगलं खोल असल्यामुळे त्याच्यापर्यंत कोणाचा हात पुरेना. इथे आपल्यामागे कोणी येत नाही म्हंटल्यावर भूभूला सुरक्षित वाटायला लागलं. आता बाहेरून सगळी माणसं त्याला बोलावत होती. त्याला बिस्कीट, केक, वेफर्स दाखवत होती. पण इतक्या सगळ्या गोंधळाने दमलेल्या भूभूला आता झोप यायला लागली होती. तो पेंगायला लागला आणि शेवटी त्या लोखंडी कपाटाच्या खाली अंधाऱ्या कोपऱ्यात धुळीने माखलेल्या फरशीवर बिचारा एकटाच अंगाची जुडी करून झोपून गेला.
आपला भूभू घरी आला आणि त्याच्याशी काही खेळायच्या आत तो कपाटाखाली जाऊन बसला यामुळे सायलीचा मूड गेला. ती बाबाच्या मागे लागली की ते कपाट हलव आणि मला भूभू बाहेर काढून दे. पण बाबाने सांगितलं की कपाट खूप जड आहे, ते हलवता येणार नाही, शिवाय कपाट हलवतांना भूभूला लागेल. त्याची झोप झाली की तो बाहेर येईल. तोवर त्याला झोपू दे.
नाईलाजाने सायली तिच्या मित्रमैत्रिणींशी खेळायला आणि त्यांनी आणलेली गिफ्ट्स उघडायला गेली. पण एकूणात तिचा मूड काही परत आलाच नाही. वाढदिवसाच्या सगळ्या एक्सईटमेंटने दमून सायली लौकर झोपली. तिच्यापाठोपाठ सगळा पसारा आवरून आईबाबा पण झोपले. घरात सामसूम झाली, आणि भूभूसाहेबांना जाग आली…


