सुट्टीचा कधी कोणाला वैताग येऊ शकतो का?पण आई-बाबांमुळे येतो!

मला ना या सुट्टीचा आता वैताग यायला लागलाय… खरंच! नकोशी झाली आहे सुट्टी. असे बघू नका माझ्याकडे. मला काही लगेचच्या लगेच शाळेत जाऊन अभ्यास बिभ्यास करायचा नाहीये. आणि मला सुट्टीचा कंटाळा आलेला नाहीये, मला “वैताग” आलाय… वै-ता-ग!

images : freepik

म्हणजे खरं तर मला सुट्टीपेक्षा आईबाबा माझ्या सुट्टीचं जे करतात ना त्याचा वैताग आलाय! किती बोअर मारतात यार ते… किती पकवतात… सकाळी “लवकर ऊठ आणि आधी दात घास” इथून जे पकवायला सुरुवात करतात ते दिवसभर सोडतच नाहीत.

“या सुट्टीत नवीन काय शिकणार आहेस त्याचं प्लॅनिंग कर. ते केलंस का? आम्हाला दाखव.”

मग आपण काहीतरी त्यांना सांगायचं, की मी पोहायला शिकणार आहे, चित्र काढणार आहे, क्रिकेट खेळणार आहे… असं काहीतरी आपण त्यांना सांगेपर्यंत ते आपल्याला पिडत राहतात आणि आपण आपला प्लॅन सांगितला रे सांगितला की लग्गेच पुढचा प्रश्न विचारतात,

“स्विमिंगच का? स्केटिंग का नाही?

“चित्रंच का? तबला का नाही?”

“क्रिकेट का? एखादा नवीन खेळ का शिकणार नाही?”

अरे! जर का मी केलेला प्लॅन तुम्हाला कधीच आवडत नाही, तर मला विचारता कशाला??? बरं एवढं एकच नसतं ते. इतका वेळ मोबाईल बघू नकोस. सारखं काय घरात तुमचं? जरा बाहेर खेळायला जा. सारखे काय उन्हात खेळताय? जरा घरात दिसा. किती दंगा करताय? जरा आवाज कमी करा. सारखे कशाला तुम्हाला मित्रमैत्रिणी लागतात? थोडं तरी आपापले खेळायला शिका आता. अरे अरे! किती डिंक लावलाय? एवढे कागद कशाला कापून ठेवलेत? हा पसारा कोण आवरणार आहे आता?

अरे एकाच सुट्टीत किती सूचना देता आणि किती पकवता? त्यापेक्षा शाळा बरी! निदान शाळेत गेल्यावर आपण काय करतोय ते त्यांना दिसत तरी नाही. तर आईबाबांनी सुट्टीत पकवू नये यासाठी काय करता येईल असा खरा प्रश्न आहे. तुमच्याकडे आहे का काही उत्तर?