वाढदिवसाला गिफ्ट म्हणून कोणी मधमाश्या मागतं का? गायत्रीने का मागितल्या?

“आई या वाढदिवसाला मला पाहिजे ते गिफ्ट देशील?” गायत्रीने आईला लाडीगोडी लावत विचारलं.

image : dreamstime

पुढच्या आठवड्यात गायत्रीचा अकरावा वाढदिवस होता. आणि तो चान्स साधून एरवी आईबाबा ज्याला नाही म्हणतात ते काहीतरी मिळवायचं असा तिचा प्लॅन होता. कारण एरवी नाही म्हंटले तरी ते आपल्या वाढदिवसाला काही कशाला नाही म्हणणार नाहीत याची तिला आशा होती. पण तिच्या अपेक्षेप्रमाणे आई काही लगेच ‘हो’ म्हंटली नाही. उलट संशयाने गायत्रीकडे बघत राहिली. कारण गायत्रीचं असं प्लॅनिंग असणार हे आईलापण माहिती होतं. पण वाढदिवसाच्या गिफ्टला ऐकून न घेता नाही म्हणणं आईसाठी पण रिस्की होतं. त्यामुळे तिने जरा विचार केला आणि म्हणाली,

“तुला काय पाहिजे त्यावर ते अवलंबून आहे ना बेटा.”

“अशी काय गं आई तू? सगळी गंमत घालवून टाकतेस! कधीतरी डायरेक्ट हो म्हणालीस तर काही बिघडेल का?”

गायत्रीला आईचा रागच आला होता. काहीही मागितलं की ही आधी हजार चौकश्या करते, मग आपल्या मित्रमैत्रिणींकडून जास्तीची माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करते, मग बाबांशी बोलून ठरवू असं म्हणते आणि अर्ध्याच्या वर वेळेला ‘नाही’च म्हणते. हे गायत्रीला अनुभवाने माहिती होतं.

आणि यावेळी तिला जी गोष्ट हवी होती, ती आधी समजली तर घरात कोणीच हो म्हणणार नाही हेही गायत्रीला माहिती होतं. त्यामुळे तिने पक्कं ठरवलं की काहीही झालं तरी चालेल, पण आईने हो म्हणेपर्यंत आपण काय पाहिजे ते सांगायचंच नाही. हे करणं सोपं नव्हतं, पण त्याशिवाय काही इलाजही नव्हता. पण आईही काही कच्च्या गुरुची चेली नव्हती. ती म्हणाली,

हेही वाचा!

नाटक एक नंबरचं झालं पण बक्षिस मात्र तिसरं मिळालं. हे असं का झालं?

“अगं तसं नाही. पण मी आधी हो म्हणायचं आणि मग ऐनवेळी ते करता आलं नाही तर तुझाच मूड जाईल. म्हणून म्हंटलं, तुला काय हवंय ते आधी सांग. शक्य असेल तर आपण नक्की आणू.”

पण आईच्या या गोड बोलण्याला फसायचं नाही हे गायत्रीचं ठरलेलं होतं. त्यामुळे तीही काही सांगेना आणि ती सांगत नाही तोवर आई हो म्हणेना. असं बराच वेळ चालल्यावर आणि गायत्री ऑलमोस्ट रडायला लागल्यावर आईने थोडीशी माघार घेतली आणि स्वतःच्या मनातली भीती बोलून दाखवली.

“हे बघ गायत्री, तू जर कुत्र्याचं पिल्लू आणायचं म्हणत असलीस तर त्याला काही आम्ही दोघं हो म्हणणार नाही. कुत्र्याचं खूप करायला लागतं, तू अजून लहान आहेस…”

“माहितीये!” गायत्री जोरात ओरडली, “यापुढचं सगळं लेक्चर मला पाठ आहे. ते परत परत सांगू नकोस. मी काही कुत्र्याचं पिल्लू मागत नाहीये!”

गायत्रीने या आधीच्या प्रत्येक वाढदिवसाला कुत्र्याचं पिल्लू मागितलं होतं. त्यामुळे आईच्या मनात तीच शंका येणं स्वाभाविक होतं. पण गायत्री कुत्र्याचं पिल्लू मागत नाहीये म्हंटल्यावर आई एकदम रिलॅक्स झाली आणि बेसावधपणे म्हणाली,

“मग ठीक आहे. दुसरं काही तुला पाहिजे असेल तर आणूया आपण.”

image : google

“नक्की ना? प्रॉमिस?” असं विचारण्यातल्या गायत्रीच्या टोनवरून आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण आता ती जे काही मागेल ते कुत्र्याच्या पिल्लापेक्षा सोपंच असेल असं गृहीत धरून आई म्हणाली, “हो नक्की. आता तरी सांगशील का तुला काय हवंय ते?”

एव्हाना बाबापण ही चर्चा ऐकायला येऊन बसला होता. तोही म्हणाला, “सांगायला तर लागेलच ना गायत्री. तू सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं कळेल?”

“बघा हां. ऐकल्यावर नाही म्हणाल तुम्ही…” आईबाबाने एकमेकांकडे बघितलं. ही मागून मागून काय मागेल? फोन किंवा लॅपटॉप. काही अटी घालून दिवसाकाठी एखादा तास या वस्तू तिला द्यायची त्यांची मनाची तयारी होती. बाबा म्हणाला, “आता आम्ही नाही म्हणणार नाही. सांग तू बिनधास्त!”

“मला ना…”

“हां…”

“आपल्या घराच्या अंगणात…”

“हां.. पुढे सांग गं…”

“मधमाश्या पाळायच्या आहेत!” गायत्रीने एका श्वासात सांगून टाकलं. 

“काय???” आई बाबा एका आवाजात ओरडले. आणि मग दोघंही एकदम हे कसं अशक्य आहे, असं काहीतरीच गिफ्ट कोणी मागतं का, असं काय काय म्हणायला लागले. गायत्री ओरडायला लागली की तुम्ही नेहेमी असंच करता, प्रॉमिस मोडता, तरी तुम्हाला कोणी रागवत नाही इ. इ.

पाच मिनिटं सगळा आरडाओरडा करून झाल्यावर शेवटी आई म्हणाली,

image : google

“बरं ते जाऊदे. मला सांग की तुला मधमाश्या का पाळायच्या आहेत?”

“कारण मधमाश्या या आपल्या पर्यावरणाचा खूप महत्वाचा भाग आहेत. आणि सगळीकडे बिल्डिंग्ज झाल्यामुळे त्यांना राहायला जागा उरलेली नाहीये. आपल्या बागेत भरपूर फुलं आहेत तर त्या इथे छान राहू शकतात.”

“हे कोणी शिकवलं तुला?” बाबाने हतबुद्ध होऊन विचारलं.

“आम्हाला शाळेत शिकवतात पर्यावरणाच्या तासाला.”

“काय? घरी मधमाश्या पाळा म्हणून??? उद्या शाळेत येते मी तुझ्या टीचरना भेटायला. त्यांच्या घरी पळू देत त्यांना मधमाश्या!” आई चांगलीच चिडली होती.

“अगं तसं नाही शिकवत गं. पण मधमाश्यांची संख्या कमी होतीये. आणि मधमाश्या नष्ट झाल्या तर माणसं पण नष्ट होतील.”

“अगं पण म्हणून आपण का पाळायच्या मधमाश्या?”

“आपण का नाही पाळायच्या आई? आपल्याकडे जागा आहे, फुलझाडं आहेत, शिवाय त्यांचं काही करायला लागत नाही, त्याची पेटी मिळते ती आणून ठेऊन द्यायची.”

“अगं पण त्या चावतील ना.”

“आई मधमाश्या अश्या उगीच चावत नाहीत. आणि उद्या खरंच माणसं नष्ट झाली तर त्यात आपण पण मरू. त्यापेक्षा आत्ता मधमाश्या पाळायला काय हरकत आहे?”

गायत्रीने तिच्या बाजूने बिनतोड युक्तिवाद केला होता. आपलं पर्यावरण, आपली पृथ्वी आपणच वाचवली पाहिजे हे तिच्या आईबाबांना मान्य होतं. पण त्यासाठी आपण अशी सुरुवात का करायची हे त्यांना समजत नव्हतं. आणि आपली पृथ्वी आहे तर सुरुवात आपणच केली पाहिजे हे गायत्रीला स्पष्ट दिसत होतं… आणि त्यांच्या विचारांमधली दरी भरून निघणं कठीण आहे… कारण कितीही झालं तरी अश्या बाबतीत मोठी माणसं लहान मुलांची बरोबरी करून शकत नाहीत!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact