तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखणारं हेल्मेट येतंय! वाचा या हेल्मेटची कमाल!

Image: unilad.com

टेक्नाॅलाॅजीच्या सहाय्याने एक नवीन जग निर्माण करणं, त्या जगात आपल्याला हवं ते करता येणं, शत्रूच्या ब्रिलियण्ट आयडियाजना धूळ चारणारी हिरोच्या बोटाच्या नखात बसवलेली मायक्रो चीप अशी स्टोरी असलेले हाॅलीवूड-बाॅलीवूडचे चित्रपट आपल्याला किती आवडतात ना. यंत्राच्या किंवा टेक्नाॅलाॅजीच्या सहाय्याने संकट ओळखून त्यावर मात करणारे सुपर हिरो तर आपले एकदम फेव्हरिट असतात ना. पण तुम्हाला काय वाटतं हे फक्त चित्रपटातच घडतं? पण या चित्रपटाच्या कथा-पटकथा लिहिणारे, असे अचाट वाटणारे चित्रपट बनवणारे शेवटी माणसंच असतात ना. माणसं हे जर चित्रपटात घडवून आणू शकतात तर मग प्रत्यक्षात का नाही होणार हे? असा प्रश्न कधी पडतो का तुम्हाला? एका संशोधनाबद्दल जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला याची नक्की खात्री पटेल.

माणूस आपल्याला आश्चर्य वाटेल, अशक्य वाटेल अशा अनेक गोष्टी करत असतो हे आपल्याला जगभरातल्या बातम्या वाचल्या-पाहिल्यानंतर कळतं. अशीच एक बातमी ऑस्ट्रेलियातली आहे. ही बातमी आहे एका संशोधनाची. हे संशोधन केलं आहे ते ऑस्ट्रेलियातील 'युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नाॅलाॅजी सिडनी' येथील शास्त्रज्ञांनी. त्यांनी आपल्या मेंदूतले विचार वाचणारे एक हेल्मेट तयार केलं आहे. हे काही जादूचं हेल्मेट नाही. तर यासाठी 'ए आय' तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

हेही वाचा!

माइंड रीडिंग हेल्मेट आहे तरी काय?

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी आर्टिफिशिअल तंत्रज्ञानाचा (कृत्रिम बुध्दिमत्तेचा) ज्याला आपण 'ए आय' म्हणतो त्याचा वापर करुन माइंड रीडिंग हेल्मेट तयार केलं आहे. या हेल्मेटला 'डी वेव' हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. यात कोडिंग- डीकोडिंगचं तंत्रज्ञान वापरलं आहे.

या हेल्मेटमधील ए आय तंत्रज्ञान मेंदूत विचारांच्या ज्या लहरी उमटतात त्या वाचल्या जावून त्या नंतर वाचता येतील अशा स्वरुपात म्हणजे शब्दांच्या माध्यमांद्वारे समोर येतात.

या  तंत्रज्ञानाचा वापर अनेक चांगल्या गोष्टींसाठी करता येणार आहे. त्यातला फायदा वैद्यकीय क्षेत्रासाठी होणार आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर रुग्णाचा जीवही जातो किंवा कायमचं अपंगत्वही येवू शकतं. हा ब्रेन स्ट्रोक येण्याआधी मेंदूत काय घडतं हे जर आधी वाचलं गेलं तर ब्रेन स्ट्रोकचा धोका टाळता येवू शकेल असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

Image: hitc.com

माइंड रीडिंग करणारं हेल्मेट कसं काम करतं हे दाखवण्यासाठी शास्त्रज्ञांनी व्हिडीओद्वारे एक डेमो (प्रात्यक्षिक ) दिलं. त्यात एका स्र्कीनसमोर हेल्मेट घातलेली माणसं बसलेली आहेत. गिनीआ पिगला स्क्रीनवर काही वाक्यं लिहायला सांगितली जातात.. गिनीआ पिग लिहितो ' गुड आफ्टरनून, तुम्ही ठीक आहात ना.. मी कॅपेचिनोने सुरुवात करणार आहे सोबत एक्सप्रेसो काॅफीही एक्स्ट्रा असेल.'

स्क्रीनवर लिहिलेली वाक्यं वाचल्यानंतर हेल्मेट घातलेल्या लोकांच्या मेंदूत कोणत्या विचारांच्या लहरी उमटल्या हे मांइड रीडिंग हेल्मेटने वाचलं आणि ते शब्दरुपात स्क्रीन्वर दिसलं.  स्र्कीनवर शब्द आले, ' दुपार आहे का ही.. गूड आफ्टरनून म्हणे.  कॅपेचिनू काय, एक्सप्रेसो काय.. काय चाललं काय आहे?'

हेही वाचा!

डेमोत २९ लोकं सहभागी झाले होते. त्या लोकांच्या मनात गिनीआ पिगने स्क्रीनवर लिहिलेल्या वाक्यानंतर आलेले विचार हेल्मेटने स्कीनवर लिहिलेल्या शब्दांच्या जवळपास जाणारे होते. यात माइंड रीडिंग हेल्मेटने ४० टक्के अचूक काम केलं होतं.

शास्त्रज्ञांना जे हवं आहे त्या बाबतीत हे माइंड रीडिंग हेल्मेट थोडं कमी अचूक असलं तरी ते योग्य ट्रॅकवर असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

माइंड रीडिंग हेल्मेट तंत्रज्ञानाने मेंदूतील विचारांच्या लहरींच्या अभ्यास करणाऱ्या गटाचे प्रोफेसर चिन टेंग लिन हे प्रमुख आहेत. अशा पध्दतीने मेंदूत उमटणाऱ्या विचार लहरींना ओळखून त्यांना शब्दरुप देणारे तंत्रज्ञान हे खूप महत्त्वाचे असून ही मोठी गोष्ट आहे. याआधी एलाॅन मस्क यांनी एक माइण्ड रीडिंग डिव्हाइसची ओळख जगाला करुन दिली आहे. पण या तंत्रज्ञानात मेंदूमध्ये सूक्ष्म चिप बसवावी लागते. पण ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी तयार केलेलं हे माइंड रीडिंग हेल्मेट म्हणजे त्यापुढचं पाऊल आहे.

माइंड रीडिंग हेल्मेट म्हणजे न्यूरो सायन्स आणि ए आय यांनी एकत्र येवून एक भाषिक माॅडेल तयार करण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे असं या क्षेत्रातील तज्ज्ञ विचारवंतांच मत आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact