स्पेसवाॅक करताना अंतराळवीरांच्या हातातून निसटली टूलकिट बॅग!

Image: news.sky.com

आपण आई वडिलांबरोबर कुठे बाहेरगावी फिरायला जातो तेव्हा किती मज्जा येते ना? पण समजा प्रवास करताना आपली बॅगच हरवली तर..? मग काय सगळ्यांचाच मूड जातो. ती बॅग शोधण्यातच इतका वेळ जातो की फिरण्याचा वेळ वाया जातो. त्यातही हरवलेली बॅग मिळाली तर ठीक नाहीतर हळहळत घरी यावं लागतं. हे फक्त इथे आपल्या बाबतीतच होतं असं नाही तर अवकाशात अंतराळवीरांच्या बाबतीतही हे घडतं. मग काय होतं, ते काय करतात? हे समजून घेण्यासाठी अवकाशात नुकत्याच झालेल्या एका घटनेकडे पाहायला हवे.  ही घटना घडली ती पृथ्वीपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये. या स्पेस स्टेशनच्या बाहेर येवून नासाचे अंतराळवीर जॅस्मीन मोघबोली आणि लोरल ओहारा स्पेस वाॅक करत होते. स्पेस स्टेशनची देखभाल दुरुस्ती करण्याच्या मिशनवर हे दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेर येवून स्पेस वाॅक करत होते. हे काम करण्यासाठी त्यांना अनेक तास लागतात. देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी त्यांच्याकडे एक स्पेस टूल किट होते. स्पेसवाॅक करताना नेमकं हे टूल किट या अंतराळवीरांच्या हातून निसटलं आणि पडलं.

आपल्या हातातून एखादी गोष्ट  निसटून खाली पडली तर आपण ती लगेच उचलून घेतो. पण अशा घटना जेव्हा अवकाशात घडतात तेव्हा हे शक्य नसतं. म्हणून अंतराळवीरांच्या हातातून निसटलेली बॅग काही त्यांना पुन्हा उचलून घेता आली नाही. पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला  असलेल्या बाहेरील कॅमेराद्वारेही या टूलकिटचा शोध घेतला असता हे टूलकिट आता पुन्हा अंतराळ स्टेशनकडे येण्याची शक्यता कमी असल्याने तरंगत्या टूलकिटचा स्टेशनला आणि स्टेशनवरील अंतराळवीरांना असलेला धोकाही कमी झालेला आहे.

 हेही वाचा!

अवकाशात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष ठेवणाऱ्या 'अर्थस्काय'नावाची संस्था आहे. या संस्थेने केलेल्या पाहणीत आता ही टूलबॅग आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशनच्या बरीच पुढे गेली असून तिथे ती तरंगत आहे. अंतराळ स्टेशनच्या दुरुस्तीचं काम या मिशनमध्ये करण्यात येत होतं. त्यासाठीचं टूलकिट या अंतराळवीरांच्या हातात होतं. ते निसटलं तेव्हा अंतराळवीरांचं या टूलकिटचं काम झालेलं होतं. राहिलेलं काम पुढच्या ४२ मिनिटात संपवून अंतराळवीर आपल्या स्पेस स्टेशनमध्ये पुन्हा परतले. अंतराळवीरांच्या हातातून निसटलेली ही टूलबॅग आता अंतराळातील कचऱ्याचा भाग झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम प्रतीच्या टेलिस्कोपच्या मदतीनं पृथ्वीवरुनही ही टूलबॅग स्पाॅट करता येवू शकणार आहे. सध्या ही टूलबॅग स्पेस स्टेशनपासून ४ कि.मीच्या अंतरावर आहे. तज्ज्ञ म्हणतात की टूलबॅग पृथ्वीपासून ११३ कि.मी अंतरावर पोहोचेल तेव्हा तिचं विघटन व्हायला सुरुवात होईल.

Image: mirror.co.uk

स्पेसवाॅक करताना हातातून टूल किट निसटण्याची घटना काही पहिल्यांदा घडली असं नाही. २००८ मध्येही स्पेस स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्पेस वाॅक सुरु असताना हेइड स्टेफनीशिन-पाइपर या अंतराळवीरांच्या हातातून टूलकिटची बॅग निसटली होती. त्यापूर्वी २००६ मध्ये स्पेसस्टेशनच्या झालेल्या देखभाल दुरुस्तीचं निरिक्षण सुरु होतं. त्यादरम्यान अंतराळवीर पियर्स सेलर्स आणि मायकल फाॅसम यांच्या हातातून १४ इंचाचा स्पॅटुला खाली पडला होता.  पण एक आहे अशा घटनांनी अनेकदा अंतराळ स्टेशनला आणि अंतराळवीरांना धोका निर्माण होतो आणि अवकाशातला कचरा देखील वाढतो.  

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact