बर्फ, पाना-फुलांपासून चित्र साकारणारा अवलिया!

चला, चित्रं काढूया!

  • आभा भागवत.

तू कधी झाडाची पानं, दगड, बर्फ, पाण्याचे थेंब, फुलं, लिंपलेली माती, काड्या वापरून चित्र काढलं आहेस का? हे चित्र कागदावर न मावणारं आहे. ते प्रत्यक्ष निसर्गात जाऊन तयार करायचं आहे. अशी चित्र, ज्यांना 'उभारणी शिल्प' म्हटलं जातं ती करणारा अवलिया ‘अँडी गोल्ड्जवर्दी’ यांच्या कलाकृती आज समजून घेऊया.

Image - Google

अँडी हे मूळचे ब्रिटिश कलाकार. १३ व्या वर्षापासून त्यांनी शेतात काम केलं होतं. “बटाटे गोळा करण्याच्या कामाप्रमाणे, तेच तेच कष्टाचं काम करण्याची सवय त्यांना त्यांच्या कलाकृती करण्यात उपयोगी पडली”, असं अँडी म्हणतात. त्यांनी निसर्ग हाच रंग म्हणून वापरला आहे आणि अवकाश हा त्यांचा कॅन्व्हास आहे. चित्रांमध्ये न दाखवता येणारं ‘काळ’ हे एक परिमाणही ते काही कलाकृतींमध्ये सुंदर पद्धतीने वापरतात.

उदाहरणार्थ – बर्फाच्या तुकड्यांनी तयार केलेली एक रचना शेजारच्या चित्रात बघ. बर्फ जसा वितळत जाईल तसं हे शिल्प नाहीसं होईल. पण बर्फाचे योग्य आकाराचे तुकडे घेऊन ही रचना उभी करणं वाटतं तेवढं सोपं नाही. सूर्य जसजसा जागा बदलतो तसतसं हे चित्र क्षणाक्षणाला वेगळं दिसतं.

चित्रात काळ किंवा काही मिनिटं, तास वापरल्याचं अजून एक मजेदार उदाहरण म्हणजे अँडी एका विशिष्ट आकारात पानांची रचना करतात आणि वाऱ्यामुळे झालेली पानांची हालचाल हा त्यांच्या कलाकृतीचा भाग असतो. कधी पानं-पानं काडीने ओवून, जोडून तयार केलेली मोठी माळ पाण्याच्या संथ प्रवाहात ते सोडतात. आणि पाणी जसं वाहात जाईल त्याप्रमाणे त्यांचं पानांच्या माळेचं चित्र वाहून पुढे जातं आणि अधिकाधिक सुंदर दिसतं. पुढच्या लेखात तुझ्या घराच्या जवळ आणि घरात अशी कुठली चित्र काढता येतील हे मी सांगते. तू ही अशी काही चित्र काढता येतील का याचा विचार करून ठेव.