आज काय बघाल?
- अर्चना भट.

आज आपण एक भरपूर जुना सिनेमा बघूया. किती जुना? म्हणजे बघा, बोलके चित्रपट यायच्या १० वर्षं आधीचा, १९२१ चा.
हा चित्रपट आहे बस्टर किटन ह्या नटाचा. चार्ली चॅप्लीनचा असतो ना तसाच, विनोदी! किटनची खासियत काय होती सांगू का? सिनेमात, पूर्णवेळ तो प्रचंड मख्ख चेहरा ठेवतो. त्यामुळे तो जरा जास्तच विनोदी वाटतो.
तर आपण आज बघुया ‘द बोट’ नावाचा सिनेमा. सिनेमात एक कुटुंब आहे. नवरा, बायको आणि दोन मुलांचं... ते सगळे मिळून एक बोट बनवतात. ती बोट घराबाहेर काढत असताना आधी घर मोडतं. मग बोटीला पाण्यात सोडतात, तर बोटच बुडते. शेवटी एकदाची त्या बोटीची डागडुजी करून ते बोटीने पॅसिफिक महासागराच्या सफरीला निघतात. रात्री एक मोठं वादळ येतं. बोट गरागरा फिरायला लागते. तिला भोक पडतं आणि वेगाने पाणी आत यायला लागतं.
बायको आणि मुलांना आतल्या खोलीत पाठवून नवरा स्वतः पाणी बाहेर काढायचा प्रयत्न सुरू करतो. एका क्षणी तो इतका दमतो, इतका दमतो की.. तेच पाणी कपात घेतो आणि बसून पितो!!
तरी शेवटी बोट बुडतेच, पण ते मात्र बोटीवरच्या लाइफ बोटमध्ये बसून पाण्यावर तरंगतात. काही वेळाने ती बोट सुद्धा बुडते. मग मात्र एक गंमत होते, काय गंमत होते हे माहिती करून घ्यायचं असेल तर सिनेमा बघा! कळेलच! ‘द बोट’ हा सिनेमा यूट्यूब वर आहे.


