आजारी मुलांना आनंदी करण्यासाठी कॅम्पबेलकडे आहे टेडी बेअरचा उपाय!

Image: themercury

इतरांना मदत करणे, त्यासाठी कायम तत्पर असणे हा चांगला गुण समजला जातो. मदत ही केवळ पैशांनीच होते असं नाही तर ती गरजेच्या वस्तूच्या स्वरुपातही होते. शिवाय आपण कष्ट करुन इतरांसाठी काही तयार करणे आणि त्यांना ते देवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हा देखील मदतीचा उत्तम मार्ग आहे. हा मार्ग कॅम्पबेल रेमेस या मुलाने तो जेव्हा नऊ वर्षांचा होता तेव्हापासून अवलंबला आहे. आता त्याच्या या मदतीने बरंच मोठं स्वरुप धारण केलं आहे. कोण हा कॅम्पबेल रेमेस आणि तो मदत करतो म्हणजे नक्की काय करतो? - तर कॅम्पबेल रेमेस हा ऑस्ट्रेलियातील टास्मानिया येथील होबार्ट शहरात राहणारा मुलगा. आता १८ वर्षांचा असलेला कॅम्पबेल जेव्हा फक्त ९ वर्षांचा होता तेव्हा त्याने स्वत:च्या हाताने पहिला टेडीबेअर तयार केला होता. हा टेडीबेअर त्याने स्वत:साठी नाही तर हाॅस्पिटमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या आजरी मुलांसाठी, त्यांच्या चेहेऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तयार केला होता. कॅम्पबेलने याआधी कधीही टेडीबेअर शिवलेला नव्हता. त्याला मुळी शिवणकामच येत नव्हतं. तरीही त्याने टेडीबेअर तयार करण्याचं ठरवलं आणि त्याला ते उत्तम जमलं.

हेही वाचा!

टेडीबेअर करण्याचं कॅम्पबेलच्या मनात आलं तेव्हा तो नऊ वर्षांचा होता. आपल्या आईसोबत नाताळाची खरेदी करण्यासाठी दुकानात गेला होता. भावंडांसाठी, नातेवाईकांसाठी भेटवस्तू घेतांना त्याच्या डोक्यात विचार चमकला. तो त्याने आईला सांगितला. 'आपण दवाखान्यात ॲडमिट असलेल्या आजारी मुलांसाठीही खेळण्या घेवू यात का?' असा प्रश्न त्याने आईला विचारला. खरंतर आईला कॅम्पबेलची ही कल्पना खूप आवडली होती. इतक्या लहान वयात हा मुलगा इतरांच्या आनंदाचा विचार करत असल्याचं बघून आईला कॅम्पबेलचं खूप कौतुकही वाटलं होतं. पण घरात आधीच ९ मुलं शिवाय आर्थिक परिस्थितीही बेताचीच. त्यामुळे त्याच्या आईने कॅम्पबेलला प्रेमाने नाही म्हटलं. पण म्हणून कॅम्पबेल नाराज झाला नाही. दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोक्यात आणखी एक कल्पना आली ती म्हणजे आपल्या हाताने टेडीबेअर तयार करण्याची. घरी आईची शिलाई मशीन होतीच.

घरी आईची शिलाई मशीन होतीच. दुकानातून घरी गेल्या गेल्या कॅम्पबेल टेडीबेअर शिवायला बसला. टेडीबेअर कसा करायचा , त्यासाठी काय काय लागतं, तो कसा शिवायचा? यातलं काहीही कॅम्पबेलला माहीत नव्हतं, येत नव्हतं. पण त्याने त्यासाठी इंटरनेटची मदत घेतली. आणि त्यावर पाहून त्याने आपला पहिला टेडीबेअर तयार केला. तो करण्यासाठी त्याला ५ तास लागले. नंतर कॅम्पबेलने टेडीबेअर तयार करण्याचा सतत सराव केला आणि कमी वेळात तो खूप टेडीबेअर तयार करु लागला. कॅम्पबेस असे लोभस, देखणे, आकर्षक आणि मऊ-मऊ टेडीबेअर तयार करायचा की पाहणाऱ्याला ते टेडीबेअर कुरवाळावेसे वाटायचे.

कॅम्पबेलच्या वयाची इतर मुलं व्हिडीओ गेम्स, स्केटबोर्ड सारखे खेळण्यात दंग असायचे त्यावेळेस कॅम्पबेल मात्र शिलाई मशीनवर तासनतास बसून आजारी मुलांसाठी टेडीबेअर तयार करायचा. स्वत: तयार केलेले टेडीबेअर जेव्हा कॅम्पबेल आजारी मुलांना द्यायचा, ते टेडीबेअर हातात घेवून जेव्हा मुलं खूष व्हायची तेव्हा त्याला सगळ्यात जास्त आनंद व्हायचा. टेडीबेअरशी खेळताना आजारी मुलं काही काळ का होईना त्यांना होणारा त्रास विसरायचे हे पाहून कॅम्पबेलला आपण घेत असलेल्या मेहनतीचे सार्थक झाल्यासारखं वाटायचं. कॅम्पबेल आठवडाभर टेडीबेअर तयार करतो आणि आठवड्यातला एक दिवस दवाखान्यात जावून तिथे ॲडमिट असणाऱ्या मुलांना स्वत:च्या हाताने देतो. आपल्या टेडीबेअरमुळे या आजारी मुलांना आनंद मिळतो, त्यांच्यात बरे होण्याचा, जगण्याचा विश्वास निर्माण होतो असं कॅम्पबेलला वाटायचं आणि तो आणखी जोमदारपणे आपल्या टेडीबेअर तयार करण्याच्या कामाला भिडायचा.

Image: .abc.net

दवाखान्यात आजारांवर उपचार घेणाऱ्या मुलांसाठी टेडीबेअर तयार करणाऱ्या कॅम्पबेलवर आपल्या वडीलांसाठीही टेडीबेअर तयार करण्याचा प्रसंग आला. कॅम्पबेलच्या वडिलांना कॅन्सरचं निदान झालं आणि त्यांच्यावर औषधोपचार सुरु झाले. घरात सर्वजण तणावात होते, पुढे काय होईल या विचाराने घाबरलेले होते. पण कॅम्पबेल मात्र शांत होता, आपले वडील पूर्ण बरे होतील याबाबत आशावादी होता. हा आशावाद त्याला त्याच्या टेडीबेअरनेच दिला होता. त्याने आपल्या कॅन्सरने आजारी वडिलांसाठी ' विनर' नावाचं टेडीबेअर तयार केलं ते टेडीबेअर त्याने आपल्या वडिलांना भेट म्हणून दिलं. कॅम्पबेलने तयार केलेलं टेडीबेअर जेव्हा वडिलांनी पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा त्यांच्यात पहिल्यांदा उठून पुन्हा कामाला लागण्याची उमेद निर्माण झाली.

कॅम्पबेलमध्ये आणि तो तयार करत असलेल्या टेडीबेअरमध्ये इतरांना दु:ख विसरायला लावण्याची जादू होती. कॅम्पबेलचे हे टेडीबेअर तयार करणं, ते दवाखान्यातील आजारी मुलांना वाटणं या कामाची चर्चा व्हायला लागली. वर्तमानपत्रात, टेलिव्हिजनवर यासंबंधीच्या बातम्या येवू लागल्या. ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनवर जेव्हा कॅम्पबेलच्या टेडीबेअरची बातमी आली तेव्हा कॅम्पबेलचं नाव जगभरात पोहोचलं. त्याचं काम जगाला समजलं. यानंतर आपल्या कामाला कॅम्पबेलने संस्थेचे स्वरुप दिले. त्याने 'प्रोजेक्ट ३६५' नावाची संस्था सुरु केली. जगभरातून कॅम्पबेलला आजारी मुलांसाठी टेडीबेअर तयार करण्यासाठी आर्थिक मदत येवू लागली. आता कॅम्पबेल फक्त आपल्या शहरातल्या आणि देशातल्याच आजारी मुलांसाठी टेडीबेअर बनवत नाही तर जगभरतल्या आजारी आणि संकटात सापडलेल्या मुलांना दिलासा आणि आनंद देण्यासाठी टेडीबेअर तयार करतो. कॅम्पबेलचे टेडीबेअर आता इतके लोकप्रिय झाले आहेत की त्याचा लिलावही अनेक ठिकाणी केला जातो. या लिलावातून जो पैसा जमा होतो तो कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांशी लढणाऱ्या मुलांच्या पालकांना त्यांच्या उपचारासाठी मदत म्हणून दिला जातो.

 Image: 7news.com

कोरोनाच्या काळात कॅम्पबेलने एक यूट्यूब चॅनेल सुरु केले. या चॅनेलवरुन तो जगभरातल्या तरुण मुलांना टेडीबेअर तयार करण्याचे प्रशिक्षण देवू लागला. आता जगभरातले अनेक तरुण मुलं मुली कॅम्पबेलला आजारी मुलांसाठी टेडीबेअर बनवण्याच्या कामी स्वत: टेडीबेअर तयार करुन साथ देत आहेत. कॅम्पबेलनं आपल्या मनातलं प्रेम टेडीबेअरमध्ये ओतलं आणी त्याच्या टेडीबेअरने हे प्रेम जगभरातल्या आजारी मुलांपर्यंत पोहोचवलं. आपल्याला इतरांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाला कृतीतून कशी वाट करुन द्यायची याचा मार्ग त्याने जगभरातल्या तरुण मुला मुलींना दाखवला आहे. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact  

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact