पर्यावरण पूरक चित्र काढणारा चित्रकार!

चित्र-चित्रकार आणि तुम्ही

- आभा भागवत. 

Image - Google.


युसुके असाई हा ४४ वर्षांचा जपानी चित्रकार आहे. लहान असताना पाठ्यपुस्तकांतल्या मजकुराच्या मध्ये मध्ये उरलेल्या रिकाम्या जागेत चित्र काढायला युसुकेला खूप आवडायचं, हीच त्याची चित्रकार होण्याची सुरुवात होती. चित्रकलेचं शिक्षण त्याला परवडणारं नव्हतं म्हणून त्याने स्वतःच स्वतःला चित्रं काढायला शिकवली. कधीकधी चित्रकलेचं पद्धतशीर शिक्षण न घेता उत्तम चित्रकार तयार होतात, याचं तो एक सुंदर उदाहरण आहे.

युसुकेला चित्रं काढण्यासाठी बाजारात मिळणारे रंग, कँन्व्हास आणि कागद वापरावेसे वाटत नाहीत. तो वेगवेगळ्या रंगांची माती, राख, फुलांच्या पाकळ्या, धूळ अशा नैसर्गिक घटकांपासून रंग करून मोठाल्या भिंतींवर, छतांवर, जमिनींवर चित्रं काढतो. त्याची चित्रं फार काळ टिकत नाहीत कारण वापरलेला पृष्ठभाग आणि रंग हे दोन्हीही विघटनशील (बायोडीग्रेडेबल) पदार्थ आहेत. आत्ताच्या पर्यावरणीय ऱ्हासाच्या काळात युसुकेची चित्र काढण्याची पद्धत हे एक महत्वाचं पर्यावरणीय विधान आहे. तो याबद्दल म्हणतो की, “काही गोष्टी सुंदर असतात, पण कायमच्या नसतात.”

भारतात बिहारमध्ये गया जिल्ह्यातल्या आदिवासी शाळेतील भिंतींवर २०१४ साली त्याने मातीचे रंग वापरून सुंदर चित्रं काढली होती. आणि ती पूर्ण झाल्यावर त्याने चित्रं धुवून टाकली. चित्रकाराला चित्रं काढताना मुलांनी बघणं, चित्रं पूर्ण होताना बघणं आणि नंतर चित्रं धुवून टाकताना बघणं या सगळ्याचाच खूप वेगळा परिणाम मुलांवर होतो. एखादी कलाकृती तात्पुरती असणं आणि ती नाहीशी होणं हेच खरं तर कलाकृतीच्या दृष्टीने नाही पण पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत (सस्टेनेबल) आहे. पुढच्या लेखात आपण अगदी युसुकेसारखी मोठ्या प्रमाणातली नाही तरी त्याच्या विचारांच्या जवळ जाणारी चित्रं कशी काढायची ते बघूया.