
सुट्टी सुरु झाली की खरी पंचाईत दहावीच्या मुलांची असते. बोर्डाची परीक्षा संपलेली आहे आणि खूप मोठ्ठी सुट्टी समोर आहे. या मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करता येऊ शकेल? काही आयडिया देऊ शकशील का, ऊर्जा?
- पोपट सहारे
- दहावीची परीक्षा संपल्यानंतर सर्वात आधी तर अभ्यासाचा सर्व ताण झटकून द्यायचा. वर्षभर शाळा, क्लास, अभ्यास, परीक्षा या चक्रात अडकून गेल्याने आपल्याला काही वेगळं विश्व आहे की नाही हे वाटायला लागतं. त्यामुळे या चक्रातून काही काळ का होईना सुटका झाल्याचा आनंद मस्त एन्जाॅय करुन घ्यावा.
- वर्षभर केवळ अभ्यासावरच फोकस केल्याने आवडीचे असूनही जे जे बाजूला ठेवायला लागले ते सर्व अवश्य करावं. आवडीचे सिनेमे पाहावेत, मित्रमैत्रिणींसोबत खेळावं. त्यांच्यासोबत वेळ घालवावा. मिळून शहरातल्या शहरात जवळच्या ठिकाणी फिरावं. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा माराव्यात.
- खरंतर हे सर्व एव्हाना सर्वांचं करुन झालं असेल. तरी अजून रिझल्ट लागेपर्यंत मोठी सुटी बाकी आहे. रिझल्ट लागल्यानंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे ठरलेलं असेल तर आपल्या आवडीच्या शाखेची तोंड ओळख करुन घ्यावी. त्यासाठी इंटरनेटचा आधार घ्यावा. किंवा त्या त्या शाखेत अभ्यास करणाऱ्या आपल्यापेक्षा मोठ्या मुलामुलींशी बोलावं, त्यांचे अनुभव ऐकावेत. असं केल्याने आपण जे निवडणार त्याविषयी सखोल माहिती आपल्याकडे जमा होईल. त्यामुळे पुढे आपल्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला काय काय करावं लागणार आहे याची मानसिक तयारी करता येते.
- आपल्या आवडीचा खेळ किंवा कला यातलं काही शिकायचं असल्यास त्यासाठी सुटीचा मोठा काळा हा उत्तम वेळ असतो.
- कम्प्युटरसंबंधी एखादा कोर्स जो पुढच्या काळात शिकताना, काम करताना उपयोगाचा ठरणार आहे तो शिकता येतो.
- उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय यासाठी इंग्रजी भाषेत उत्तम बोलता लिहिता येणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा उत्तम करण्याचा प्रयत्न या सुटीत अवश्य करता येईल.
- फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश यासारखी एखादी परकीय भाषा शिकण्याचाही विचार नक्की करता येईल.
-आपल्याकडे जी कला, कौशल्य आहे त्यात आणखी प्रगती करण्यासाठी स्वत: त्याचा सराव करुन प्रयत्न करता येतील किंवा त्यातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेता येईल.
- वाचन करण्याची सवय या सुटीत अवश्य लावावी. वेगवेगळ्या गोष्टींबद्दल भरपूर वाचावं. पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्रं वाचावीत. वाचनाने माहितीसोबत मेंदूला ऊर्जा मिळते. ही वाचण्याची सवय पुढील टप्प्यातील शिक्षणासाठी नक्कीच फायदेशीर ठरते.
- घरातल्यांसोबत वेळ घालवणे, गप्पा मारणे, घरकामात मदत करणे, आवडीचे पदार्थ करणे,स्वयंपाक करणे या गोष्टी मनसोक्त करुन घ्याव्यात. कारण एकदा का रिझल्ट लागला की काॅलेजात प्रवेश घेण्याची धावपळ सुरु होईल. मग काॅलेज सुरु झाल्यावर नवीन वातावरणाशी जुळवून घेता घेता अभ्यास आणि परीक्षा यांचं चक्र पुन्हा सुरु होईल. यापुढच्या काळात कराव्या लागणाऱ्या धावपळीसाठी स्वत:ला शारीरिक, मानसिकदृष्ट्या फिट करण्याचा ही सुटी म्हणजे उत्तम संधी आहे. ती केवळ काय करु? या प्रश्नाने कन्फ्यूज होऊन वाया घालवू नका.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


